सातारा - पुणे बंगळुरू महामार्गावर साताऱ्यानजीकच्या बोरगाव हद्दीत बनावट दारूची वाहतूक करणारा ट्रक पकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) आणि उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने संयुक्तरित्या ही कारवाई केली. या कारवाईत बनावट दारू आणि ट्रकसह १ कोटी ९० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सचिन विजय जाधव (रा.आळसंद, ता. खानापूर, जि. सांगली) आणि जमीर हरुण पटेल (रा. मलकापूर, ता. कराड, जि. सातारा) यांना अटक करण्यात आलीय.
खबऱ्याच्या माहितीवरून कारवाई - अशोक लेलँड कंपनीच्या ट्रकमधून सोमवारी (२८) रात्री बनावट दारूची वाहतूक केली जाणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरूण देवकर यांना खबऱ्याकडून मिळाली होती. त्यानुसार एलसीबी आणि उत्पादन शुल्क विभागाच्च्या भरारी पथकाने बोरगाव (ता. सातारा) हद्दीत सापळा रचला होता. मंगळवारी पहाटेच्या सुमारास ट्रक (क्र. एम. एच. ५० /४०९६) आलेला ट्रक अडवून तपासणी केली असता ट्रकमध्ये रॉयल किंग स्पेशन मॉल्ट व्हिस्की, रॉयल ब्लॅक ऍपल वोडका, रॉयल ब्ल्यू मॉल्ट व्हिस्की, अशा वेगवेगळ्या कंपनीच्या बनावट दारूची बॉक्स आढळून आली.

एक कोटीचा मुद्देमाल जप्त - ट्रकमधील ८५ लाखांची दारू आणि दारूची वाहतूक करणारा ट्रॅक, असा १ कोटी ९० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला. याप्रकरणी ताब्यात घेतलेल्या संशयितांवर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, उत्पादन शुल्कचे निरीक्षक माथव चव्हाण तसेच बोरगाव पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.
हेही वाचा...