मुंबई- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुणाल कामराच्या वादग्रस्त विनोदावर अखेर आपले मौन सोडलंय. त्यांनी कुणाला कामराला खडे बोल सुनावलेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्यालाही मर्यादा असायला हवी. 'अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. आम्हाला व्यंगदेखील समजते, पण त्यालाही एक मर्यादा असायला हवी. हे एखाद्याविरुद्ध बोलण्यासाठी 'सुपारी' घेण्यासारखे आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हॅबिटॅट स्टुडिओमध्ये केलेल्या तोडफोडीच्या घटनेवर शिंदे म्हणाले की, समोरच्या व्यक्तीनेही एक पातळी राखली पाहिजे अन्यथा प्रत्येक कृतीची प्रतिक्रिया असते.
मी तोडफोडीचे समर्थन करत नाही : ते पुढे म्हणाले, 'या व्यक्तीने (कामरा) सर्वोच्च न्यायालय, पंतप्रधान, पत्रकार आणि काही उद्योगपतींवरही भाष्य केले होते. हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही. जणू काही तुम्ही कोणासाठी तरी काम करीत आहात, असेच यातून स्पष्ट होत असल्याची टीकाही एकनाथ शिंदे यांनी केलीय. "मी यावर जास्त बोलणार नाही. मी तोडफोडीचे समर्थन करत नाही," उपमुख्यमंत्री पुढे म्हणालेत. आरोपांना उत्तर देण्यापेक्षा विकास आणि कल्याणकारी योजनांना प्राधान्य देण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भर दिलाय.
मी नेहमीच कामाला प्राधान्य दिलंय : "आजकाल मी आरोपांना उत्तर देत नाही. मी नेहमीच म्हणतो की, माझे काम माझे उत्तर असेल. मी नेहमीच कामाला प्राधान्य दिलंय. अटल सेतू, कोस्टल रोड (मुंबईतील दोन्ही) आणि मेट्रो प्रकल्प असे सर्व प्रकल्प अचानक थांबले होते. आम्ही विकास आणि कल्याणकारी योजनांना प्राधान्य देत ते पुन्हा सुरू केले," असंही एकनाथ शिंदेंनी अधोरेखित केलंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लाडकी बहीण योजना, लखपती दीदी योजना आणि मुलींसाठी मोफत शिक्षण देण्याचा निर्णयासह अनेक कल्याणकारी उपक्रमांवर प्रकाश टाकला. राज्य सरकारने अनेक निर्णय घेतलेत आणि आवश्यक सरकारी ठराव (GR) अंमलात आणले आहेत, मी कोण काय म्हणतो, याकडे लक्ष देत नाही; मी माझ्या कामांद्वारे त्यांना उत्तर देतो," असे ते पुढे एकनाथ शिंदे म्हणालेत.
हेही वाचाः
कॉमेडियन कुणाल कामराकडून निवेदन जारी; म्हणाला, "एकनाथ शिंदे आणि अजित पवारांची..."