मुंबई : मुंब्रा रेल्वेजवळील धोकादायक वळणावर काल (दि.9) दोन जलद लोकलच्या पायदानावर उभे राहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या बॅगा एकमेकांना लागल्यानं मोठा अपघात झाला. या अपघातात चार जणांनी आपला जीव गमावला, तर 8 जण जखमी झाले. दरम्यान, मुंब्रा रेल्वेजवळील वळण धोकादायक असून देखील या वळणावर गाड्यांचा वेग कमी केला जात नसल्याची बाब प्रवासी संघटनांनी वेळोवेळी रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. याबाबतचं वृत्त "ईटीव्ही भारत"नं सोमवारी प्रकाशित केलं होतं. त्यानंतर आता मुंब्रा येथील या धोकादायक वळणावर जलद गाड्यांचा वेग कमी करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला असून, आज सकाळपासून कळवा ते मुंब्रा दरम्यान या गाड्या धीम्या गतीनं धावत आहेत.
३५ किलोमीटर प्रतितास वेग : "मध्य रेल्वेच्या धीम्या मार्गांवर गाडीचा सरासरी वेग सुमारे ३५ किलोमीटर प्रतितास असतो, तर जलद मार्गांवर गाडीचा सरासरी वेग सुमारे ४० ते ५० किलोमीटर प्रतितास असतो. मुंब्रा स्थानकावर जिथं अपघात झाला, तिथं आता वेग मर्यादा कमी करून सदर धोकादायक मार्गावर ३५ किलोमीटर प्रतितास वेग ठेवण्यात आला आहे," अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉक्टर स्वप्नील नीला यांनी दिली आहे.
मध्य रेल्वेच्या विविध विभागाकडून तपासणी : दरम्यान, सोमवारी झालेल्या अपघातानंतर मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळील त्या धोकादायक वळणाजवळ रेल्वे अधिकारी दाखल झाले. रेल्वे ट्रॅकच्या वळणाबाबत तक्रारी आल्यानंतर अधिकाऱ्यांनी अपघातस्थळी तपासणी केली. फास्ट अप आणि डाऊन दोन्ही मार्गांमध्ये किती अंतर आहे, याची मोजणी देखील मध्य रेल्वेच्या अभियंत्यांच्या टीमनं केली. तसंच अपघात स्थळाची मध्य रेल्वेच्या विविध विभागाकडून तपासणी केली जात आहे. यात मध्य रेल्वेचे अभियंते लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दल अशा विविध टीम सदरील घटनास्थळाची तपासणी करत आहेत.
स्वयंचलित दरवाजे असणाऱ्या गाड्या चालवण्याबाबत निर्णय : या अपघातानंतर सोमवारी सायंकाळी रेल्वे बोर्डानं देखील सोमवारी तत्काळ बैठक घेतली. या बैठकीला रेल्वे मंत्री आश्विन वैष्णव, रेल्वे बोर्डाचे अधिकारी आणि इंटिग्रल कोच फॅक्टरी टीमसोबत सविस्तर बैठक घेतली. या बैठकीत मुंबईत धावणाऱ्या नॉन-एसी लोकल ट्रेनमध्ये स्वयंचलित दरवाजे असणाऱ्या गाड्या चालवण्याबाबत निर्णय झाल्याची माहिती मध्य रेल्वेनं दिली आहे. दरम्यान, मुंबईत सध्या दोन प्रकारच्या लोकल ट्रेन धावत आहेत. त्यातील एक म्हणजे नॉन एसी म्हणजे साध्या गाड्या आणि दुसऱ्या म्हणजे एसी लोकल. यातील एसी लोकलचे दरवाजे स्वयंचलित असून ते प्रत्येक स्थानकावर उघडतात आणि बंद होतात. साध्या गाड्यांचे दरवाजे मात्र नेहमी उघडेच असतात.
व्हेंटिलेशन युनिट्स बसवले जाणार : नॉन-एसी गाड्यांमध्ये स्वयंचलित दरवाज्यांशी संबंधित सर्वात मोठी समस्या म्हणजे प्रचंड गर्दी, हवा खेळती न राहिल्यानं ऑक्सिजन पुरवठा न होणं आणि त्यामुळं प्रवासी गुदमरण्याचा धोका असतो. याच कारणास्तव साध्या गाड्यांचे दरवाजे हे नेहमी उघडेच ठेवले जातात. यावर उपाय म्हणून साध्या लोकलच्या डिझाईनमध्येच बदल करण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागानं दिली आहे. तसंच, या बैठकीत सध्या गाड्यांचे दरवाजे बंद असतानाही हवेचा प्रवाह सुनिश्चित करण्यासाठी दरवाज्यांमध्ये लूव्हर्स बसवण्याचा निर्णय रेल्वे बोर्डानं घेतला असून, बाहेरून ताजी हवा आत घेण्यासाठी कोचच्या छतावर व्हेंटिलेशन युनिट्स बसवले जाणार आहेत.
नवीन डिझाइन करण्यात येणाऱ्या ट्रेन जानेवारी २०२६ पर्यंत सेवेत : प्रवाशांना एका डब्यातून दुसऱ्या डब्यात सहज जाता यावं आणि गर्दी नैसर्गिकरित्या संतुलित करता यावी म्हणून डब्यांमध्ये वेस्टिब्यूल बसवण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागानं दिलेल्या माहितीनुसार, या नवीन डिझाइनसह पहिली ट्रेन नोव्हेंबर २०२५ पर्यंत तयार होणार असून, आवश्यक चाचण्या आणि प्रमाणपत्रानंतर, ती जानेवारी २०२६ पर्यंत सेवेत दाखल केली जाणार आहे. मुंबई उपनगरीय नेटवर्कसाठी बांधल्या जाणाऱ्या २३८ एसी ट्रेन व्यतिरिक्त या गाड्या असल्याची माहिती मध्य रेल्वेनं दिली आहे.
हेही वाचा :