अहिल्यानगर(कोपरगाव) : इंजिनिअरिंगच्या नोकरीतून माघार घेऊन, शेती क्षेत्रात पाऊल ठेवणारा जेऊर पाटोदा गावातील 'प्रतिक धुमाळ' (Pratik Dhumal) हा तरुण आता यशस्वी शेतकरी म्हणून ओळखला जाऊ लागलाय. 'ई टीव्ही भारत' च्या या स्पेशल रिपोटमध्ये पाहा तरुण शेतकऱ्याची यशोगाथा...
नोकरीचा दिला राजीनामा : कोपरगाव तालुक्यातील जेऊर पाटोदा येथील प्रतिक धुमाळ या तरुणाचे प्राथमिक शिक्षण कोपरगावात झालं. सुरुवातीच्या शिक्षणानंतर त्यानं आपल्या करिअरची सुरूवात पुण्यात ऑटोमोबाईल क्षेत्रात इंजिनियर म्हणून केली. स्थिर नोकरी, चांगला पगार आणि सुखी जीवनाची त्याची कल्पनाही होती. परंतु, त्याला एका गोष्टीनं सतत अस्वस्थ केलं ते म्हणजे रासायनिक खतांचा वापर करून पिकवलेल्या पालेभाज्या आणि फळे यांचा शहरात केला जाणारा वापर. त्यामुळं प्रतिकनं वैदिक आणि नैसर्गिक पद्धतीनं शेती करण्याचा निर्णय घेतला. 2021 मध्ये त्यानं त्याच्या नोकरीचा राजीनामा दिला आणि आपल्या मूळ गावी येऊन शेतीचा यशस्वी प्रयोग सुरू केला.
पारंपरिक शेतीमध्ये होतो फायदा : शेतीची सुरूवात करण्यासाठी त्याच्याकडं चार एकर शेती होती. परंतु, इथूनच त्याच्या संघर्षाला सुरूवात झाली. शेतीमध्ये रासायनिक खताचा वापर न करता नैसर्गिक पद्धतीनं उत्पादन घेणं त्याच्यासाठी सुरुवातीला खूप कठीण होतं. मात्र, त्यानं हार मानली नाही. जमीन आणि पिकांची काळजी घेणाऱ्या या वैदिक पद्धतीनं त्याला लवकरच आश्चर्यकारक परिणाम दाखवले. काही महिन्यांतच त्याच्या शेतात उत्पादन वाढलं आणि त्याला विश्वास आला की पारंपरिक पिकांमध्ये नैसर्गिक पद्धतीनं शेती केल्यानं फायदा होतो.
वर्षाला किती उत्पन्न? : प्रतिक धुमाळ या तरुणानं त्याच्याकडील चार एकर क्षेत्रातील काही भागात मिर्ची, टोमॅटो, त्याचबरोबर टरबूज आणि खरबूजसारख्या फळभाज्यांची लागवड केली. या फळभाज्यांना त्यानं व्यापाऱ्यांना न देता स्वतः थेट बाजारात विक्री केली. ज्यामुळं दलालांना वगळून जास्त नफा मिळवता आला. यामुळं त्याचं उत्पन्न आता 6 ते 7 लाख रुपये वर्षाला पोहोचलं आहे. प्रतिकच्या या यशाचं मुख्य कारणं म्हणजे, त्याची मेहनत आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि पर्यावरणाच्या भल्यासाठी काम करण्याची त्याची तयारी आहे.
'शेतकरी टू ग्राहक' विक्री : पुण्यातील एका नामवंत कंपनीत 2016 पासून ज्युनिअर इंजिनिअर म्हणून प्रतिक धुमाळ काम करत होता. त्याला वर्षाला 3 लाखांचं पॅकेज होतं. मात्र, आज स्वतःकडं असलेल्या 4 एकर क्षेत्रात विविध फळभाज्यांची शेती करून वर्षाला सहा ते सात लाख रुपये कमवतोय. आपल्या शेतातील विविध फळभाज्या व्यापाऱ्यांना न देता थेट स्वतः 'शेतकरी टू ग्राहक' अशा पद्धतीनं बाजारात विक्री करण्यास सुरूवात केली. पगारापेक्षा जास्त पॅकेज त्याला शेती व्यवसायातून मिळत आहे. नैसर्गिक पिकवलेल्या फळभाज्या लोकांना खाऊ घालतोय. याचा आनंद होत असल्याचं प्रतिक धुमाळ यानं 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितलं.
हेही वाचा -