मुंबई : वसई- विरार महापालिका हद्दीतील अनधिकृत बांधकाम प्रकरणी सक्तवसुली संचनालयानं 13 ठिकाणी धाडी टाकल्या. वसई विरार महापालिकेचे वास्तुरचनाकार वाय. एस. रेड्डी हेच ईडीच्या रडारवर होते. या छाप्यात 8.6 कोटींची रोकड, 23.25 कोटींचं सोनं आणि हिरेजडीत दागिने जप्त केले असून अनेक कागदपत्रंही ईडीनं ताब्यात घेतली आहेत. वास्तुरचनाकाराच्या घरातून तब्बल 30 कोटीचं घबाड मिळाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.

ईडीच्या कारवाईला बेकायदेशीर बांधकामांची पार्श्वभूमी : बुधवारी सकाळी 7 वाजता मुंबई आणि हैदराबाद इथं विविध ठिकाणी एकाचवेळी ही कारवाई सुरू करण्यात आली. यात बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक तसेच भाजपाचे कार्यकर्ते विनीत तिवारी यांचीही चौकशी सुरू होती. वसई-विरार महानगरपालिकेच्या नालासोपारा पूर्वेकडील डंपिंग ग्राऊंडकरता राखीव जागेवर साल 2009 पासून हळूहळू करत उभारलेल्या अनधिकृत 41 इमारती जमीनदोस्त करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं 8 जुलै 2024 रोजी दिले होते. या निकालाला रहिवाश्यांनी सर्वोच्च न्यायालयात दिलेलं आव्हान फेटाळण्यात आल्यानंतर पालिका प्रशासनानं जानेवारी 2025 मध्ये हातोडा चालवायला सुरूवात केली. इथं सलग 24 दिवस कारवाई करत या इमारती 20 फेब्रुवारी रोजी जमीनदोस्त केल्या.

वसई-विरार महापालिकेतील भ्रष्टाचार ईडीच्या रडारवर : नालासोपाऱ्यातील या 41 अनधिकृत इमारती जमीनदोस्त केल्यानंतर सक्तवसुली संचलनालयानं (ईडी) या संपूर्ण घोटाळ्याची चौकशी सुरू केली. पालिकेतील भ्रष्टाचाराबाबत मीरा-भाईंदर पोलिसांत विविध विकासक आणि स्थानिक नेत्यांविरोधात दाखल एफआयआरवर ईडीनं आपला ईसीआयआर दाखल केला आहे. त्यानुसार बुधवारी सकाळी ईडीनं विविध ठिकाणी एकाच वेळी छापेमारी सुरू केली.

ईडीच्या रडारवर कोण कोण : वसई विरार महापालिकेचे वास्तुरचनाकार वाय. एस. रेड्डी यांच्या निवासस्थानी ईडीच्या हाती मोठं घबाड लागलं. याशिवाय या छापेमारीत सिताराम गुप्ता, बिल्डर अनिल गुप्ता, यांचा समावेश होता. सलग 8 तास सुरू असलेल्या या कारवाईमुळे वसई -विरारमध्ये एकच खळबळ उडाली. ईडीच्या अधिकार्यांनी बुधवारी सकाळी सीताराम गुप्ता यांच्या नालासोपाऱ्यातील संतोषभुवन येथील निवासस्थानासह अन्य 13 ठिकाणी छापे टाकले. नालासोपारा येथील अंबावाडी येथील भाजपाचे पदाधिकारी विवेक तिवारी यांच्या निवासस्थानी, बिल्डर अनिल गुप्ता यांच्या कार्यालय, वसई पूर्वेच्या मधूबन मधील राम रहीम अकॉर्ड सोसायटीमधील 701, 702 या सदनिकेतही धाड टाकून तपासणी करण्यात आली आहे. अंबावाडी येथील अपना सहकारी बँकेतही चौकशी करण्यात आली. मात्र, छापेमारीनंतर या प्रकरणाचा माझा काही संबंध नसल्याचं विवेक तिवारी यांनी स्पष्ट केलं.
राजकीय क्षेत्रात आगामी महापालिका निवडणुकांची चर्चा : वसई -विरारमध्ये ईडीची धडक कारवाई सुरू झाल्यामुळे येत्याकाळात इथं मोठा राजकीय भूकंप होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत इथं बड्या भाजपानेत्यासोबत घडलेला प्रसंग आणि आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर केल्या जात असलेल्या ईडी कारवाईमुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीवर याचा थेट परिणाम होऊ शकतो हे मात्र नक्की.
हेही वाचा :