सरकारला मोठा धक्का ; रश्मी शुक्ला यांची बदली करण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश
केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या बदलीचे आदेश दिले आहेत. रश्मी शुक्ला यांच्यावर विरोधकांनी फोन टॅपींगचे आरोप केले होते.


Published : November 4, 2024 at 12:20 PM IST
|Updated : November 4, 2024 at 12:32 PM IST
नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगानं दिले आहेत. त्यामुळे हा विद्यमान महायुती सरकारला मोठा धक्का मानला जात आहे.

रश्मी शुक्ला यांना निवडणूक आयोगाचा दणका : फोन टॅपिंग प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची अखेर बदली करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीला काही दिवसांचा अवधी शिल्लक असताना केंद्रीय निवडणूक आयोगानं रश्मी शुक्ला यांची बदली करून सरकारला फार मोठा धक्का दिला आहे. यासाठी तीन आयपीएस अधिकाऱ्यांचं पॅनल तयार करण्यात आलं आहे. त्यांच्याकडून अहवाल मुख्य सचिवांना देण्यात येणार आहे. त्यानंतर तो अहवाल केंद्रीय निवडणूक आयोगाला सादर केला जाईल. रश्मी शुक्ला यांना अद्याप दुसऱ्या ठिकाणची पोस्टिंग देण्यात आली नाही.
कायदा सुव्यवस्था बिघडली : याबाबत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, "यासाठी मी निवडणूक आयोगाला मनापासून धन्यवाद देतो. रश्मी शुक्ला या भाजपाच्याच काम करत होत्या. त्यांना शिंदे - फडवणीस सरकारनं दोन वर्षाची अवैध मुदतवाढ दिली. या बदलीसाठी इतके दिवस का लागले? हा प्रश्न अजूनही आमच्या मनात आहे. त्या या पदावर बसल्यानंतर राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली होती. त्यांना या पदावरून हटवलं असलं, तरी निवडणुकीशी संबंधित कुठल्याही व्यवस्थेत त्या काम करता कामा नयेत, याची काळजी निवडणूक आयोगानं घ्यावी," अशी विनंतीही नाना पटोले यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला केली आहे.
देर आए दुरुस्त आए : याबाबत बोलताना विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, "हा निर्णय घ्यायला सरकारनं फार उशीर केला. फोन टॅपिंग प्रकरणामध्ये रश्मी शुक्ला यांच्यावर आरोप होते. असे आरोप असताना सुद्धा त्यांना पोलीस महासंचालक पदावर बढती देणं हे फार चुकीचं होतं. देर आए दुरुस्त आए, असं म्हणू शकतो," असंही अंबादास दानवे म्हणाले.
हेही वाचा :

