पुणे Drugs Selling FC Road Pune : पुणे हे विद्येच माहेरघर म्हणून देशभरात प्रसिद्ध आहे. राज्यासह देशातील तसंच परदेशातील विद्यार्थी पुण्यात शिक्षणासाठी येतात. तसंच नोकरीच्या दृष्टीनंही पुणे हे नावाजलेलं शहर आहे. मात्र, हेच शहर आता ड्रग्ज प्रकरणामुळं चर्चेत आलं आहे. मागील काही महिन्यांमध्ये पुणे शहरातून करोडो रुपयांचं ड्रग्ज जप्त करण्यात आलं होतं. अनेकांनाही या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. आता पुन्हा एकदा पुण्यातील एफसी रोडवरील नामांकित हॉटेलमध्ये ड्रग्ज विक्री होत असल्याचं समोर आलं.
पोलीस अधिकारी निलंबित : "पुण्यातील एफसी रोडवर एल ३ नावाचा एक बार आहे. त्या ठिकाणी दिलेल्या वेळेपेक्षा अधिक वेळेपर्यंत हा बार सुरू होता. दोन मालकांनी हा बार पुढे तीन जणांना चालवायला दिला होता. एका इव्हेंट मॅनेजरने ४० ते ५० लोकांना तिथे पार्टी करण्याची परवानगी हॉटेल मालकांना विचारली. रात्री १.३० नंतर बारचे मुख्य प्रवेशद्वार बंद केले आणि दुसऱ्या गेटने तिथे आत जाण्याची परवानगी दिली. यातील सर्व जणांना ताब्यात घेतले आहे. एल ३ बार सील करण्यात आला आहे. जो व्हिडिओ व्हायरल होत आहे तो पदार्थ कोणता आहे याचा ड्रग्ज विरोधी पथक तपास करत आहे. १८८ कलम, महाराष्ट्र दारूबंदी कायदा या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील बीट मार्शल यांना निलंबित केलं आहे," अशी माहिती पोलीस उपायुक्त संदिप गिल यांनी दिली.
पाच जण पोलिसांच्या ताब्यात : या प्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं आतापर्यंत ५ जणांना ताब्यात घेतलं आहे. पुण्यातील एफसी रोडवर असलेल्या 'लिक्वीड लीजर लाउंज'वर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारवाई केली आहे. हॉटेलच्या मालकालासुद्धा ताब्यात घेण्यात आलं आहे. याठिकाणी असलेला एक मॅनेजर आणि एक कर्मचारीसुद्धा पोलिसांच्या ताब्यात आहे. संतोष कामठे, रवी माहेश्र्वरी, मानस मलिक, योगेंद्र आणि शर्मा असे ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.
पुण्यात उघडपणे ड्रग्ज विक्री : पुण्यातून कोट्यवधींचं ड्रग्ज जप्त करण्यात आलं असतानाच आता सर्रासपणे विक्री होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. फर्ग्युसन रोडवरील एका प्रसिद्ध हॉटेलमधून सर्रासपणे ड्रग्ज विक्रीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एका पार्टीत काही तरुण बाथरूममध्ये ड्रग्ज घेताना आढळून आले आहेत. तसंच अनेक अल्पवयीन मुलं दारू पित असल्याचं समोर आलं आहे. पुणे शहरात शनिवारी रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या पार्ट्यांमध्ये ड्र्ग्जची विक्री होत असल्यानं अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
देश-विदेशातून अनेक तरुण-तरुणी शिक्षणासाठी पुणे शहरात असल्यानं मोठी अडचण निर्माण झाली आहे. आजची घटना गंभीर असून प्रशासनाकडून त्याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. - चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री
काय म्हणाले रवींद्र धंगेकर? : “या प्रकरणात पूर्णपणे पोलिसांची चूक आहे. ड्रग्ज मोठ्या प्रमाणावर पुण्यात उपलब्ध आहे. पुणे शहरात हुक्का पार्लरच्या नावाखाली अशी ड्रग्जची विक्री केली जात आहे. यात पोलिसांचीच चूक आहे. पोलीस अधिकारी त्याकडं दुर्लक्ष करतात. असे धंदे पैशासाठी चालतात. उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई हे राजपूतसारख्या अधिकाऱ्याला पाठीशी घालतात. त्यामुळं शंभूराज देसाईंना करोडो रुपये मिळतात," असा गंभीर आरोप आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला.
पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील एफसी रोडवरील एका नामांकित हॉटेलमध्ये अल्पवयीन मुलांचा ड्रग्ज घेत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या प्रकरणात उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा - सुषमा अंधारे, नेत्या- शिवसेना (उबाठा)
अल्पवयीन मुलांना दारू देण्यास मनाई : पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर पब, हॉटेल, बारवर पोलिसांची कारवाई सुरू झाली होती. हॉटेल्समध्ये अल्पवयीन मुलांना दारू देण्यास बंदी घालण्यात आली होती. तसंच दारूच्या दुकानांमध्ये 21 वर्षाखालील मुलांना दारू देण्यास मनाई करण्यात आली होती. मात्र, आता मुलांना ड्रग्ज दिल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळं पोलीस प्रशासन नेमकं काय करत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पुण्यात ड्रग्जची विक्री : पुणे ड्रग हब बनत असल्याचं चित्र आहे. शहरासह उपनगरातही ड्रग्ज तस्करीच्या घटनात वाढ होत आहे. पोलिसांनी पूर्वी केलेल्या कारवाईत कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले होते. पोलीस आयुक्तांनी प्रत्येक पोलीस ठाण्याला ड्रग्जबाबत कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. मात्र, आता फर्ग्युसन रोडवरील घटनेनंतर पोलिसांची कारवाई थंडावलीय का? असा प्रश्न पुणेकरांसमोर उभा राहिलाय. पुण्यातील या प्रमुख रस्त्यावर सर्रासपणे ड्रग्जची विक्री होत असल्यानं पोलीस काय कारवाई करणार? याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.
'हे' वाचलंत का :
- उद्धव ठाकरेंना 'ती' पत्रकार परिषद भोवणार? निवडणूक आयोगानं मागवला अहवाल - Uddhav Thackeray
- विधानसभेसाठी महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला? भाजपाच्या दाव्यानं शिवसेना, राष्ट्रवादीचं टेन्शन वाढण्याची शक्यता - Assembly Elections 2024
- ...अन्यथा बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं मूळ आरक्षण सोडून सर्व रद्द करा - मनोज जरांगे पाटील - Maratha Reservation