नाशिक : अवकाळी पावसामुळे महानगरपालिकेचं पितळ उघड पडलं आहे. नालेसफाईवर करोड रुपये खर्च करून सुद्धा पाणी थेट रस्त्यावर येत असल्यानं नालेसफाईबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. महानगरपालिकेनं शहरात पाणी सचणारी 200 हुन अधिक ठिकाणं शोधून काढली आहेत.

अवकाळी पावसामुळे शहरात दाणादाण : यंदाच्या वर्षी मे महिन्यातच अवकाळी पावसानं शहरात दाणादाण उडून दिली. अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखालील गेले, तसेच अनेक झाडं कोसळल्यानं जीवितहानी सोबत अनेकांच्या वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे. नाशिक महानगरपालिकेच्या बांधकाम विभागानं पावसाळ्यात रस्त्यावर पाणी तुंबून शहर ठप्प होऊ नये, यासाठी सहा विभागात शोध घेतला असता पाण्याचे तब्बल 290 ब्लॅक स्पॉट शोधून काढली आहेत. या ब्लॅक स्पॉटवर पावसाळ्यात पाण्याचा निचरा करण्यासाठी बांधकाम विभागानं अॅक्शन प्लॅन तयार केला असून त्यावर काम सुरू केलं आहे. पावसाळ्यात या ठिकाणी पाणी साचणार नाही, असा दावा महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाकडून केला जात आहे. नाशिक शहरात दरवर्षी पावसात रस्त्यावरच पावसाचं पाणी साचते. त्यात भर म्हणजे भुयारी गटारीची क्षमता अपुरी असल्यानं अनेकदा गटारीचं पाणी थेट रस्त्यावर येत असल्यानं रस्त्याचं रूपांतर तळ्यात होते. शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या मेनरोड, रविवार कारंजा, सारडा सर्कल, शालीमार, गंगापूर रोड, अशोकस्तंभ, कॉलेज रोड आदी ठिकाणी पाणी साचण्याचं प्रमाण अधिक असते. पंचवटी नाशिकरोड, सिडकोतील रस्त्यावरही पाणी साचण्याचं प्रकार वाढलं आहेत. अनेक ठिकाणी दुकानात व घरांमध्ये पाणी शिरत असल्यानं अनेकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो.
आरोग्याचा प्रश्न उद्भवतो : उघड्या नाल्यात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्या, बाटल्या, कचरा साचत असल्यानं त्यामुळे गटारी, नाले चोकअप होऊन दुर्गंधी युक्त पाणी रस्त्यावर तसेच अनेकांच्या घरात जाते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही उद्भवतो. तसेच वाहन चालक यांना देखील रस्त्यावरून वाहनं चालवताना कसरत करावी लागते. सिडकोतील गणेश चौक व्यापारी संकुल भागात मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी रस्त्यावर साचते. त्यामुळे येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. अवकाळी पावसातच अशी परिस्थिती असून पावसाळा सुरू झाल्यास काय परिस्थिती राहील, त्यामुळे या ठिकाणी नालेसफाईचे काम त्वरित करावं. अन्यथा जनआंदोलन उभं केलं जाईल, असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.
पाणी साचणारी शोधली 290 स्पॉट : "मोठया प्रमाणात होणाऱ्या पावसामुळे दरवर्षी रस्त्यावर पाणी साचून नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे यंदा बांधकाम विभागानं सर्वेक्षण करीत पाणी साचणारी शहरातील सहा विभागातील शहरातील 209 ठिकाणी शोधले आहेत. या ठिकाणी उपाययोजना केल्या जात आहे. भविष्यात या ठिकाणी पाणी साचणार नाही, अशा प्रकारचे नियोजन केलं जात आहे," असं नाशिक महानगरपालिकेचे शहर अभियंता संजय अग्रवाल यांनी सांगितलं.
विभागनिहाय ब्लॅक स्पॉट
सातपूर 37,
पंचवटी 28 ,
नाशिक पश्चिम 27,
नाशिक पूर्व 21,
सिडको 63,
नाशिक रोड 43
एकूण 209
हेही वाचा :