पुणे : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे कार्यकारी संचालक डॉक्टर धनंजय केळकर यांनी रुग्णालयाची बाजू मांडत गरोदर महिला मृत्यू प्रकरणात शासनाच्या तीन समिती नेमल्या असून त्यांचा अहवाल आल्यावर अभ्यास करून रुग्णालय आपलं मतं मांडणार आहे, असं सांगितलं. तसंच मानद स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ डॉ. सुश्रुत घैसास यांनी दीनानाथ रुग्णालयाचा राजीनामा दिला असल्याची माहिती केळकर यांनी दिली.
दीनानाथ रुग्णालयाचे कार्यकारी संचालक डॉक्टर धनंजय केळकर यांची आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.यावेळी त्यांनी याबाबत माहिती दिली.
राहू-केतू काय डोक्यात आला... - दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने भिसे कुटुंबीयांना दहा लाख रुपयाचा डिपॉझिट मागितलं होतं का, याबाबत डॉ. केळकर म्हणाले की, आमच्याकडे डॉक्टर कोणत्याही रुग्णाकडून डिपॉझिट मागत नाहीत. तसंच चौकटीत कोणीही लिहित देखील नाही. पण त्यादिवशी कोणत्या कारणाने राहू-केतू काय डोक्यात मध्ये आला की डॉ. घैसास यांनी चौकोनात १० लाखांचं डिपॉझिट लिहिलं. ही गोष्ट खरी आहे. आजवर मी अगणित शस्त्रक्रिया केल्या आहेत, पण आतापर्यंत कोणालाही असं लिहून दिलं नसल्याचं यावेळी केळकर म्हणाले.
डॉ. सुश्रुत घैसास याचा राजीनामा - यावेळी डॉ. केळकर म्हणाले की, डॉ. सुश्रुत घैसास (मानद स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ) यांनी आज रुग्णालय प्रशासनाकडे आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. गेल्या काही दिवसातील सामाजिक प्रक्षोभामुळे आपण अत्यंत दडपणाखाली वावरत आहोत, हे त्यांनी त्यांच्या राजीनाम्यात नमूद केलं आहे. निनावी धमक्यांचे फोन, समाज माध्यमांवर होणारी कठोर भाषेमधील टीका आणि सामाजिक संघर्षग्रस्त तणावाचं वातावरण हे त्यांच्या सहन होण्याच्या पलीकडे आहे हे ही त्यांनी राजीनाम्यात सांगितलं. या परिस्थितीमध्ये ते त्यांच्या वैद्यकीय पेशावर पुरेशा प्रमाणात लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्या इतर रुग्णांवर अन्याय होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. तसंच आपल्या कुटुंबीयांच्या सुरक्षिततेच्या तसंच हिताच्या दृष्टीने त्यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या प्रकरणाची व्याप्ती तसंच गांभीर्य लक्षात घेता रुग्णालय प्रशासनाने त्यांचा राजीनामा लता मंगेशकर मेडिकल फौंडेशन विश्वस्त मंडळासमोर ठेवला आहे. डॉ. घैसास यांच्या देखरेखीखाली असलेल्या रुग्णांची पर्यायी व्यवस्था योग्य प्रकारे होईपर्यंत (सुमारे ३-४ दिवस) रुग्णालयात काम करण्याची विनंती मान्य केली आहे, असं यावेळी केळकर म्हणाले.
कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग - या प्रकरणानंतर रुग्णालयाने अनामत रक्कम बंद केली आहे. डिपॉझिट रक्कम ही जास्त खर्च अपेक्षित असणाऱ्या रुग्णांकडून घेतली जात होती. तसंच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांमध्ये बोलण्याबाबत जी संवेदनशीलता पाहिजे, मदत करण्याची इच्छा पाहिजे ती सुधारण्यासाठीची सूचना आणि कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग देण्यात येत आहे, असं देखील यावेळी केळकर म्हणाले.
टॅक्स थकवलेला नाही - दीनानाथ रुग्णालयाने २७ लाख रुपयांचा टॅक्स महापालिकेचा थकवला आहे. याबाबत केळकर यांना विचारलं असता ते म्हणाले की, आम्ही एकही रुपयांचा टॅक्स थकवलेला नाही. आमचं कोर्टात प्रकरण सुरू असून टॅक्सचे पैसे आम्ही कोर्टात भरत असल्याचं यावेळी केळकर यांनी सांगितलं.
हेही वाचा..
- पुण्यातील मंगेशकर रुग्णालयानं २७ कोटींहून अधिकचा कर थकवला; रुग्णालयावर कारवाई करा, युवक काँग्रेसची मागणी
- महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी घेतली भिसे कुटुंबीयांची भेट; रुग्णालयाच्या 'त्या' कृतीवर व्यक्त केली नाराजी
- "'इमर्जन्सी'मध्ये रुग्णाकडून अनामत रक्कम घेणार नाही", दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा मोठा निर्णय