ठाणे - राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनप्रवास, त्यांचे साहित्य, त्यांची आंदोलने आणि विचार होलोग्राफीसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनुभवण्याची संधी नागरिकांना उपलब्ध होणार आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने कल्याण डोंबिवली महापालिकेच्या ‘ड’ प्रभाग कार्यालयाशेजारी उभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील ज्ञान केंद्राचे लोकार्पण येत्या रविवारी १३ एप्रिल रोजी होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील ज्ञान केंद्रात शेकडो पुस्तके असलेले ग्रंथालय, चित्र, दृकश्राव्य (डिजीटल) रूपाने मांडण्यात आलेला डॉ. बाबासाहेबांचा जीवनप्रवास अनुभवता येणार आहे. हे देशातील एकमेव असे अत्याधुनिक ज्ञान केंद्र ठरणार आहे.
खा. श्रीकांत शिंदे यांचे प्रयत्न - कल्याण लोकसभा मतदारसंघातील कल्याण पूर्व भागात आंबेडकरी अनुयायांची संख्या मोठी आहे. या परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक व्हावे अशी स्थानिकांची मागणी होती. त्यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी प्रयत्न सुरू केले होते. यासाठी जागा आवश्यक होती. ‘ड’ प्रभाग समितीच्या परिसरात जागा होती. मात्र त्यावर प्रभाग समितीचे आरक्षण होते. त्यामुळे हे आरक्षण बदलण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला. अखेर ३ नोव्हेंबर २०२१ रोजी ‘ड’ प्रभाग समिती कार्यालयाच्या जागेवरील १३०० चौरस मीटर क्षेत्राचे आरक्षण क्रमांक ४२३ हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी बदलण्यात आले.

८ कोटी ७४ लाखांचा निधी - विशेष म्हणजे डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने विक्रमी वेळेत आरक्षण बदलाचा निर्णय झाला होता. त्यापूर्वीच यासाठी ५ कोटींचा निधी एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून उपलब्ध झाला होता. या निर्णयानंतर ८ कोटी ७४ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर १२ एप्रिल २०२२ रोजी तत्कालिन नगरविकास तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या स्मारकाच्या कामाचे भूमीपूजन पार पडले. त्यानंतर या स्मारकाचे काम काम सुरू झाले.

आंबेडकर संवाद साधत असल्याचा आधुनिक प्रयोग - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा आणि ज्ञान केंद्र, ज्यात भव्य ग्रंथालय, होलोग्राफीच्या माध्यमातून थेट डॉ. बाबासाहेब आंबेडकर संवाद साधत असल्याचा आधुनिक प्रयोग या स्मारकात केला जाणार होता. त्यानुसार १० मार्च २०२४ रोजी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या स्मारकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले होते. दुसऱ्या टप्प्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्र, भव्य ग्रंथालय आणि होलोग्राफी दालनाचे काम नुकतेच पूर्ण झाले असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला १३ एप्रिल २०२५ रोजी याचे लोकार्पण होणार आहे.

रविवारी १३ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता कल्याण पूर्वेतील ‘ड’ प्रभाग कार्यालयाच्या आवारातील स्मारकात हा दिमाखदार सोहळा होणार असल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. यावेळी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे.

देशातील एकमेव केंद्र - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्र हे देशातील एकमेव केंद्र आहे. मुंबई किंवा भारतात कुठेही असे केंद्र नाही. केवळ माहिती न देता थेट संवाद साधणारे हे केंद्र आहे. इथे मोठ्या डिजीटल स्क्रीन्स बसवण्यात आल्या आहेत. येथे कियॉस्कवर क्लिक करून तुम्ही नव-नव्या गोष्टी जाणून घेऊ शकता. येणाऱ्या पिढ्यांना बाबासाहेब आंबेडकरांबद्दलची सर्व माहिती इथे प्रत्यक्ष उपलब्ध आहे. तसेच, इथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्यावर संशोधन करू इच्छिणाऱ्यालाही तशी सोय आहे, अशी माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, यांनी दिली.

असे आहे ज्ञान केंद्र
१. या स्मारकातील ज्ञान केंद्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बालपण व शिक्षण यासंदर्भातील विविध पॅनल आणि बॅकलिट पॅनेलद्वारे माहिती देण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आई-वडील व जन्मासंबधीची फिल्म एका भिंतीवर प्रोजेक्टरच्या माध्यमातून दाखविली जाणार आहे.
२. दुसऱ्या दालनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील दोन मोठे सत्याग्रह दाखविण्यात येणार आहेत. त्यात चवदार तळे सत्याग्रह असून तळ्याची त्या काळातील प्रतिकृती बनविण्यात आली आहे. येथेच चवदार तळे सत्याग्रहाची चित्रफीत दाखविण्यात आली आहे. तसंच काळाराम मंदिराची प्रतिकृती उभारून त्यामध्ये टीव्ही स्क्रीनद्वारे चित्रफीत दाखविण्यात आली आहे.
३. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजकीय कारकिर्दीची माहिती व्हिडिओ पॅनेल्सच्या माध्यमातून दाखवण्यात येते आहे. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विवाहाची माहिती टच स्क्रीन पॅनलद्वारे दाखविण्यात आली आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बहिष्कृत समाजासाठी केलेल्या कामांचा आढावा प्रोजेक्टर आणि पॅनलच्या माध्यमातून दाखविला जातो आहे.
४. येथे होलोग्राफी तंत्रज्ञानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वतः संवाद साधत असल्याचा अनुभव घेता येणार आहे. तसेच येथे ग्रंथालयही उभारण्यात आले असून इ बुकही उपलब्ध करून देण्यात आले आहेत.