ठाणे: भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडर यांची (Ambedkar Jayanti 2025) सोमवारी (14 एप्रिल) 134 वी जयंती महाराष्ट्रासह देशभरात साजरी करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने ठाण्यातील बाबासाहेबांच्या अनेक आठवणी ताज्या झाल्या आहेत. ठाण्यात बाबासाहेब खटल्यांच्या निमित्ताने अनेकदा सुनावणीसाठी उपस्थित राहिले होते. त्यामुळंच त्यांची एक आठवण रहावी म्हणून टेंभी नाका शेजारी असलेल्या रस्त्याला 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग' असं नाव ही देण्यात आलंय. बाबासाहेब त्यांच्या दूरदर्षीपणामुळं देखील ओळखले जातात. त्यांनी त्यावेळी कायदा, अर्थशास्त्र इत्यादींबाबत लिहिलेल्या अनेक गोष्टी आजही उपयुक्त ठरतात. असाच एक खटला त्यांच्या दूरदर्शीपणाची साक्ष देतो. हा खटला होता लैंगिक ज्ञान मांडणाऱ्या एका मासिकाचा, तो देखील ९० वर्षांपूर्वीचा. या ऐतिहासिक खटल्यात बाबासाहेब पराभूत झाले मात्र, तरीही ते जिंकले....
'समाजस्वास्थ्य' मासिकाविरोधात न्यायालयात खटला : 1934 साली बाबासाहेब वकिली करताना 'समाजस्वास्थ्य' या मासिकासाठी लढले. याची सुनावणी बॉम्बे उच्च न्यायालयात झाली होती. र. धों. कर्वे यांचं हे मासिक होतं. त्यांनी लैंगिक ज्ञान, आरोग्य इत्यादी अनेक गोष्टी मासिकातून मांडल्या होत्या. मात्र, त्या काळात हा प्रकार वेगळ्या नजरेने पाहिला जात होता. त्यामुळं मासिकाविरोधात न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. बाबासाहेबाचा या खटल्यात पराभव झाला. मात्र, आज या शिक्षणाचं महत्त्व सर्वच स्तरावर मानण्यात आलं असून ही काळाची गरज असल्याचं देखील समोर आलंय.
न्यायालयात काय म्हणाले होते बाबासाहेब? : विकृतीला शिक्षणानेच पराभूत करता येऊ शकतं, हे बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळात दाखवून दिलं होतं. 'समाजस्वास्थ' या मासिकात वाचकांच्या प्रश्नांना उत्तर देत असताना दिलेल्या माहितीवरून हा खटला दाखल करण्यात आला होता. या खटल्यात अश्लीलता पसरवल्याचा आरोप करण्यात आला होता. विकृत प्रश्नांना प्रसिद्धी का देता?, असा प्रश्न न्यायाधीशांनी केला होता. त्यावर, "विकृतीला ज्ञानाने आणि शिक्षणानेच पराभूत करता येऊ शकतं", असं उत्तर बाबासाहेबांनी दिलं होतं. परंतु, या खटल्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर हे पराभूत झाले होते. कालांतराने लैंगिक शिक्षण किंवा लैंगिक अडचणींवर बोलणं हे विकृती कमी करण्यासाठीच कामाला येत असल्याचं समाजानं सिद्ध केलं. यामुळंच आता लैंगिक शिक्षणावर पुस्तक देखील उपलब्ध झाल्याची माहिती ज्येष्ठ अभ्यासक आणि ज्येष्ठ पत्रकार राजीव डाके यांनी दिली. तर 24 सप्टेंबर 1927 साली चवदार तळ्याच्या सुनावणीसाठी बाबासाहेब ठाण्यातील न्यायालयात आले होते.
वकिली सोडून डॉक्टर होण्याचा दिला होता सल्ला : बाबाहेबांनी अनेकांना शिक्षणात मदत केली होती. ठाण्यातील अशाच एका महिला अनुयाला वैद्यकीय शिक्षण घेऊन काळानुसार गरीब रुग्णांना उपचार करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार या महिला डॉक्टरने शिक्षण पूर्ण करत गरिबांची सेवा करत बाबासाहेबांचं स्वप्न देखील पूर्ण केलं होतं. अशी माहिती ज्येष्ठ वकील जालिंदर यादव यांनी दिली.
खटल्यांसाठी ठाण्यात अनेकदा वास्तव्य: ठाण्यातील भाजपा आमदार संजय केळकर यांचे वडील मुकुंद केळकर आणि बाबासाहेबांचे अनेक वर्षांचे स्नेह सबंध होते. असं असल्यामुळंच बाबासाहेब ठाण्यात आल्यावर मुकुंद केळकर यांच्या निवासस्थानी वास्तव्याला थांबत होते. 1937 साली मुंबई येथे झालेल्या एका हत्या प्रकरणात देखील बाबासाहेब ठाणे न्यायालयात आले होते. या खटल्यात देखील बाबासाहेब विजयी झाले होते. अशा अनेक बाबासाहेबांच्या आठवणी अनेकांनी पाहिल्या असल्याची माहिती, जालिंदर यादव यांनी दिली.
हेही वाचा -
- महामानवाच्या 134 व्या जयंती निमित्त पवित्र दीक्षाभूमीवर बौद्ध अनुयायांकडून अभिवादन
- बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत जय भीम पदयात्रा
- बाबासाहेब आंबेडकर हे आमच्यासाठी राष्ट्रपुरुष, त्यांच्या मार्गाने पुढे जाण्याचा संकल्प करू यात - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस