पिंपरी चिंचवड : सर्व समाजातील लग्नातील बडेजाव पणाला आळा घालण्यासाठी आता पिंपरी चिंचवड शहरातील मराठा समाज आणि इतर सर्व समाजांनी कंबर कसली आहे. पिंपरी चिंचवड शहरात शनिवारी सकल मराठा समाज, सकल ओबीसी समाज आणि इतर बारा बलुतेदार समाजाची एक संयुक्त महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये सर्व समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी काही महत्त्वाचे ठराव पारित केले. जमीन आणि इतर पारंपरिक संपत्ती विकून लग्न करू नका, कमीत कमी पाहुण्यात लग्न करा, व्यवसायातून आलेला पैशातून लग्नाचा खर्च करा, बडेजावपणा दाखवण्यासाठी दुसऱ्यांचा अनुसरण करू नका असे महत्त्वाचे ठराव आज सर्व समाजाच्या बैठकीत पारित करण्यात आले आहेत. त्याचबरोबर पुढील पंधरा दिवसात पिंपरी चिंचवड शहरात सर्व समाजाची एक समिती गठीत करण्यात येणार आहे आणि सर्व समाजासाठी एक आचार संहिता देखील तयार करण्यात येईल अशी माहिती आज या बैठकीत सहभागी झालेल्या सर्व समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
रूढी परंपरांना व्यापारी स्वरूप निर्माण झालय : "केवळ मराठा समाजाच नव्हे तर सर्व बारा बलुतेदार समूहाला एकत्र करून ही बैठक घ्यायचं ठरलं आहे. कारण ती काळाची गरज आहे. समाजात असणारा रूढी परंपरा त्या असाव्यात. परंतु त्याला एक व्यापारी स्वरूप निर्माण झाला आहे. लग्न सोहळ्यासारख्या कार्यक्रमात देण्या घेण्याची प्रथा केल्याशिवाय लग्न सोहळा होत नाही. यावरच या गोष्टी फक्त अवलंबून आहेत. असा समज प्रत्येक समाजामध्ये होत आहे. हेच वैष्णवी हगवणेच्या माध्यमातून संपूर्ण समाजाला कळतंय. यापेक्षा दुसरं दुर्दैव काय?. आज या गोष्टी वैष्णवी गेल्यानंतर समजायला लागल्या आहेत. हीच मोठी शोकांतिका आहे," असं बारा बलुतेदार संयुक्त बैठकीचे आयोजक भाऊसाहेब भोईर म्हणाले.
गावोगावी जाऊन करणार काम : हुंड्याची मागणी कोणी एखाद्या कुटुंबाकडं केली. तर त्याचवेळी व्यक्त होण्यासाठी कोणीतरी पाहिजे. मदत म्हणून कोणाला तरी सांगता आलं पाहिजे. वैष्णवीच्या वडिलांना देखील हे सांगण्यासाठी कुठं जागा नव्हती. म्हणून सर्व आम्ही समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती एकत्र येत हुंडाबळी सारख्या गोष्टीवर आळा घालण्याचं काम पिंपरी चिंचवड शहरातून करत आहोत. ही सुरवात स्वतःच्या घरातून प्रथमतः झाली पाहिजे, म्हणून आम्ही पिंपरी चिंचवड शहरातून गावोगावी जाऊन या हुंडाबळी घटनांवर काम करणार आहोत. येत्या पंधरा दिवसात सर्व आचारसंहिता तयार करून घटना ठराव मंजुर करून या कामात गावातील तरुण, ज्येष्ठ एकत्र येऊन हुंडाबळीसारख्या घटनेला हद्दपार करणार आहोत," असं प्रतिपादन आयोजक भाऊसाहेब भोईर यांनी केलं.
हेही वाचा :
- बेस्टच्या भाडेवाढीनंतर एका महिन्यात 74 कोटीनं महसूल वाढला, मात्र बेस्टचे 'एवढे लाख' प्रवासीही घटले
- शिक्षणाच्या माहेरघरात 'थ्री इडियट्स' स्टाईल चोरी; प्राध्यापकानंच विद्यार्थ्यांच्या मदतीनं चोरले इंजिनिअरींगचे पेपर
- राहुल गांधींनी महाराष्ट्राच्या मतदारांचा अपमान केलाय; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिक्रिया