ठाणे : इंग्रजीत बोलण्यावरून मराठी-उत्तर भारतीयात वाद होऊन भर रस्त्यात बेदम मारहाणीची घटना मंगळवारी घडली. ही घटना डोंबिवली पश्चिमेतील जुनी डोंबिवली परिसरातील रस्त्यावर घडली. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. याप्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात दोन्ही महिलांच्या वेगवेगळ्या तक्रारी दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पवार यांनी दिलीय.
"मराठीत बोला" असं सांगून केली मारहाण : मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली पश्चिमेतील जुनी डोंबिवली परिसरातील रस्त्यावरून जात असताना "एस्क्युज मी" या इंग्रजी शब्दावरून मोठा वाद निर्माण झालाय. गणेश श्रद्धा बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या पूनम अंकित गुप्ता या महिलेला इंग्रजीत बोलल्यामुळे "मराठीत बोला" असं सांगून तिला आणि तिच्या कुटुंबाला बेदम मारहाण करण्यात आलीय. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, याप्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात दोन्ही महिलांच्या वेगवेगळ्या तक्रारी घेत तीन आरोपींविरोधात अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आलीय. मात्र याप्रकरणी अशा लोकांवरती कठोर कारवाई करण्याची मागणी पीडित कुटुंबांकडून करण्यात आली आहे.
कशी घडली घटना? : जुनी डोंबिवली येथील गणेश श्रद्धा बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या पूनम अंकित गुप्ता या 7 एप्रिल 2025 रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मैत्रिणीसोबत घराकडं परत जात असताना बिल्डिंगबाहेर रस्त्यावर उभ्या असलेल्या काही लोकांना बाजूला होण्यासाठी त्या "Excuse me" असं इंग्रजीत म्हणाल्या. या साध्या वाक्यावरून संतप्त झालेल्या अनिल पवार, त्यांची पत्नी आणि बाबासाहेब गोविंद ढ़बाले आणि त्यांच्या काही साथीदाराने "इंग्रजी नको, मराठीत बोला" म्हणत पूनम आणि त्यांच्या मैत्रिणीला बेदम मारहाण केलीय.
विष्णूनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल : इतकेच नव्हे तर या गोंधळात पूनम यांचा नवरा आणि दुसरी मैत्रीण तेथे मदतीला आले असता त्यांनाही मारहाण करण्यात आलीय. मारहाणीत पूनम यांच्या नाकातील फुली तुटून नुकसान झालंय. या प्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान कलम 115(2), 352, 324(4) अंतर्गत तक्रार नोंदवण्यात आलीय. पोलिसांनी तीन आरोपींविरोधात अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद घेत तपास सुरू केलाय. या घटनेमुळं डोंबिवलीतील मराठी विरुद्ध उत्तर भारतीय समाज यामधील तणाव पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. स्थानिक राजकीय नेत्यांकडूनही या घटनेबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा -