शिर्डी (अहिल्यानगर) : साईबाबांची शिर्डी नेहमीच भाविकांनी गजबजलेली असते. येथे आलेला भाविक साईंच्या श्रद्धनं भावनिक झालेला दिसून येतो. याच श्रद्धेपोटी भाविक येथील कुत्र्यांना मायेनं प्रसादातील गोड पदार्थ खाऊ घालतात. मात्र, हिच माया आता कुत्र्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरत आहे. तसंच शिर्डीतील साई मंदिर परिसरातील कुत्रे लठ्ठ होताना दिसून येत आहेत. यावरच 'ईटीव्ही भारत'चे शिर्डी प्रतिनिधी रविंद्र महाले यांचा हा स्पेशल रिपोर्ट...
कुत्र्यांमध्ये वाढला लठ्ठपणा : साईबाबांच्या शिर्डीत देशातूनच नव्हे तर विदेशातून वर्षाकाठी साडेतीन कोटीपेक्षा अधिक भाविक दर्शनासाठी येतात. मुळातच साईबाबांनी आपल्या हयातीत मुक्या प्राण्यांची सेवा केली. भिक्षेत मिळणारं अन्न ते प्राणी आणि पक्षांसोबत वाटून खात. याच भावनेमुळं भाविक देखील शिर्डीत आल्यानंतर दानधर्म करताना दिसून येतात. भाविक आपल्याकडील प्रसाद येथील कुत्र्यांना खाऊ घालतात. अलीकडं शिर्डीतील मंदिर परिसरातील कुत्र्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लठ्ठपणा दिसून आलाय. ऐरवी शेतातील आणि पाळीव कुत्र्यांचं शरीर हे सडपातळ आणि कणखर असतं. मात्र, येथील कुत्रे कमालीचे लठ्ठ, सुस्तावलेले आणि त्वचारोगानं ग्रासलेले दिसून येत आहेत.
का वाठत आहे कुत्र्यांमध्ये लठ्ठपणा? : साई मंदिरातून बाहेर पडताना भाविकांना मोफत बुंदी प्रसाद वितरीत केला जातो. भाविक मंदिर परिसरात बसून तो सेवन करतात. अशावेळी कुत्रा जवळ आला की, त्यालाही हा गोड बुंदीचा प्रसाद खाऊ घालतात. तसेच मंदिर परिसराबाहेर पेढे, खडीसाखर असे अति गोड पदार्थ कुत्र्यांना दिले जातात. महत्त्वाचं म्हणजे, दिवसभर ही प्रक्रिया सुरुच असते. त्यामुळं अनावश्यक साखर कुत्र्यांच्या पोटात जावून ते लठ्ठ झाल्याचं दिसून येत असल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन वेन्दे यांनी दिली.
भाविक कुत्र्यांना देतात बुंदी, पेढे : पशूवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मते, "दिवसभरात भाविक बदलत (ये-जा) असतात. मात्र, कुत्रे तेच असल्यानं अतिगोड पदार्थ त्यांच्या पोटात जातात. नेहमीच गोड पदार्थ खाल्ल्यानं त्यांना फक्त लठ्ठपणाच नाही तर अनेक आजार होवून त्यांचं जीवनमान देखील कमी होतंय. भाविक श्रद्धेनं बुंदी, पेढे कुत्र्यांना देतात. मात्र, हे त्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे."
कुत्र्यांच्या पोटाचा भाग फुगत आहे : शिर्डीतील व्यावसायिक देखील वाढत्या कुत्र्यांच्या संख्येनं त्रस्त आहेत. बाहेरील गावातून येथे कुत्रे आणून सोडले जातात. नंतर या कुत्र्यांना पेढे, बुंदी अशा गोड पदार्थांची लत लागते. याशिवाय ते इतर पदार्थ खातच नाही. दिवसेंदिवस कुत्र्यांच्या पोटाचा भाग फुगत चाललाय. जर पेढे किंवा गोड पदार्थ व्यतिरिक्त अन्य पदार्थ त्यांना दिले तर ते भुंकतात. यावरुन ते फक्त गोड पदार्थांचे शिकार होत असल्याचं स्थानिक सांगतात.
शिर्डीनगरीत शंभरहून अधिक कुत्रे : शिर्डीनगरीत भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, मंदिर परिसर, चावडी, द्वारकामाई, सभामंडप, लाडू विक्री केंद्र, मोफत बुंदी प्रसाद वितरण कक्ष अशा ठिकाणी जवळपास शंभरहून आधिक कुत्रे दिसून येतात. यातील असंख्य कुत्रे गजबलेल्या ठिकाणी देखील सुस्तावलेले पाहायला मिळत आहेत.
लठ्ठ कुत्र्यांच्या आरोग्य समस्या कोणत्या : डायबेटीस, हृदयविकार, सांधेदुखी, सांधे रोग, जसे की ऑस्टियोआर्थराइटिस, सीसीएल जखम आणि डायबिटीज मैलिटस, हृदयरोग, श्वसन रोग, मूत्रपिंडाचा आजार, यकृत रोग, स्वादुपिंडाचा दाह, त्वचा रोग आणि विकार, लघवीची स्थिती, ट्यूमर आणि कर्करोग, कमी आयुर्मान याव्यतिरिक्त, अनेक आजार लठ्ठपणामुळं कुत्र्यांना होतात.
मुक्या प्राण्यांच्या आरोग्याशी खेळू नका : शिर्डीत कुत्र्यांना गोड पदार्थ देऊ नयेत, असे फलक लावणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्यांची आरोग्य तपासणी करत उपाययोजना करव्यात, अशी देखील मागणी केली जातेय. सध्या शिर्डीत कुत्र्यांच्या अनेक समस्या पुढे येत असून, प्राणीमित्र तसेच प्रशासन यांनी याकडं लक्ष देण्याची गरज आहे. मुक्या प्राण्यांना बोलता येत नाही, मात्र त्यांचा शरीराच्या व्याधी सर्वकाही सांगून जातात. कृपया करुन देवाच्या दारात पुण्य कमवण्याच्या नादात मुक्या प्राण्यांच्या आरोग्याशी खेळू नये, अशी विनंती व आवाहन पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन वेन्दे यांनी केलंय.
हेही वाचा -