बाळासाहेबांच्या मुशीत तयार झालेल्या राज ठाकरेंचे 'राज' तुम्हाला माहीत आहेत का? जाणून घ्या
जनमानसावर प्रचंड प्रभाव सोडणारे नेते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे असलेल्या राज ठाकरे यांच्यात वडील आणि काकांकडून व्यंगचित्रकला आणि काकांकडून राजकीय नेतृत्वाचा वारसा उपजत मिळाला.

Published : June 14, 2025 at 11:11 AM IST
मुंबई- फर्डे वक्ते, करिश्माई व्यक्तिमत्व, आक्रमक नेता अशी ओळख असलेल्या राज ठाकरे यांचा आज, 14 जून रोजी वाढदिवस आहे. 14 जून 1968 रोजी जन्मलेले राज ठाकरे आज 57 वा वाढदिवस साजरा करत आहेत. साक्षात स्वरांचा बादशाह अशी ओळख असलेल्या मोहम्मद रफीकडून मराठी गाणी गाऊन घेणारे संगीत दिग्दर्शक श्रीकांत ठाकरे यांचे चिरंजीव आणि जनमानसावर प्रचंड प्रभाव सोडणारे नेते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे असलेल्या राज ठाकरे यांच्यात वडील आणि काकांकडून व्यंगचित्रकला आणि काकांकडून राजकीय नेतृत्वाचा वारसा उपजत मिळाला.
स्वरराज श्रीकांत ठाकरेः राज ठाकरे यांचं पाळण्यातलं नाव 'स्वरराज' आहे, हे फारसं कुणाला ठाऊक नाही. श्रीकांत ठाकरे यांच्यासारख्या 'व्हायोलिनचे जादूगार' असलेल्या प्रतिभासंपन्न संगीत दिग्दर्शकाच्या मुलामध्ये संगीतगुण असणारच, हा अनेकांचा समज राज यांनी खोडून काढला. म्हणजे राज यांना संगीतक्षेत्राचा उत्तम कान आहे, गायकीचा गळा नाही. मात्र राज यांचं आवाज हेच अस्त्र त्यांना प्रभावी वक्ता म्हणून राजकारणात प्रचंड साथ देऊन गेलं, आजही देत आहे. नाही म्हणायला राज यांनी तबला, गिटार आणि व्हायोलिनचं प्रशिक्षण घेतलं आहे. पण त्यांचे सूर मात्र जुळले ते राजकारणात. शिवाय राज ठाकरे हे यांनी जे जे स्कूल ऑफ आर्टमधून शिक्षण घेतलं आहे.

राजकारणाची जाण: काका शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज ठाकरे यांनी राजकारणाचे धडे गिरवले. काकांच्या जवळपास प्रत्येक सभेत त्यांची उपस्थिती असे. बाळासाहेबांचं निरीक्षण करता करता त्यांची वक्तृत्व शैली, लकब त्यांनी आत्मसात केली. परिणामी महाराष्ट्राला जबरदस्त वक्तृत्वगुण असलेला युवा राजकीय नेता मिळाला. शिवसेनेची अंगीकृत भारतीय विद्यार्थी सेनेचे प्रमुख म्हणून राज ठाकरे यांनी आपलं अस्तित्व दाखवायला सुरुवात केली. बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून मिळालेल्या बाळकडूचा वापर त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी आणि राजकीय समज वाढवण्यासाठी झाला.
राज-शर्मिला यांची प्रेमकथा: राज ठाकरे यांचं लग्न शर्मिला वाघ यांच्याशी झालं. शर्मिला या विख्यात नाट्यनिर्माता मोहन वाघ यांच्या कन्या. मुंबईतल्या रुपारेल कॉलेजच्या कॅम्पसमध्ये राज आणि शर्मिला पहिल्यांदा भेटले. शिरीष पारकर हे त्यांचे कॉमन मित्र. ओळखीचं, मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. शर्मिला या राज यांच्यापेक्षा दोन वर्ष मोठ्या असल्याने विवाहात अडथळा येईल की काय अशी भीती शर्मिला यांना वाटत होती. मात्र दोन्ही प्रेमी जीवांच्या सुदैवाने तसं काही घडलं नाही. पूर्वाश्रमीच्या शर्मिला वाघ राज यांच्याशी विवाहानंतर शर्मिला ठाकरे झाल्या. दोघांच्या संसारवेलीवर अमित आणि उर्वशी ही फुलं उमलली. आज शर्मिला आणि राज ठाकरे आजी-आजोबा झाले आहेत. अमित ठाकरे यांचा चिरंजीव कियान हा शर्मिला आणि राज यांचा जीव की प्राण आहे.
राजकीय प्रवास: बाळासाहेब ठाकरे यांचे राजकीय वारस हे त्यांची सावली असणारे राज ठाकरे हेच होणार, याची शिवसैनिकांना खात्रीच होती. पण नव्वदच्या दशकाच्या उत्तरार्धात बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव पक्षीय राजकारणात सक्रिय झाले आणि अनेकांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. दोघं खांद्याला खांदा लावून शिवसेनेसाठी मैदान गाजवत होते. आपल्यात कोणतीही कटुता नसल्याचा पुनरुच्चार दोघेही करत राहिले. मात्र त्यांच्यात सारं आलबेल नव्हतं. याची प्रचिती आलीच.

शिवसेना ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनाः 2003 मध्ये शिवसेनेचे महाबळेश्वर येथे अधिवेशन भरवलं होते. त्यात शिवसेना, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या राजकीय कारकिर्दीला कलाटणी देणारा निर्णय घेण्यात आला होता. त्याच अधिवेशनात उद्धव ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून निवडलं गेलं. मुख्य म्हणजे उद्धव यांचे सख्खे चुलत भाऊ आणि पक्ष नेतृत्वाच्या शर्यतीतले एकमेव स्पर्धक राज ठाकरे यांनीच उद्धव ठाकरे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे उत्तराधिकारी असतील, असे संकेत आधीपासूनच मिळत होते. राज यांनी आपल्याकडून ही कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर शिवसेनेची धुरा हळूहळू उद्धव ठाकरे यांच्या हातात आली. महाबळेश्वर अधिवेशनानंतर राज ठाकरे यांना शिवसेनेच्या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत फारसं स्थान मिळालं नाही. 2004 च्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंच्या अनेक समर्थकांचं तिकीट कापण्यात आलं, अशी चर्चा झाली. त्यामुळे राज ठाकरे शिवसेना पक्षात अस्वस्थ झाले. राज ठाकरे यांनी 2006 मध्ये शिवसेना सोडली. शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरे हे इतर कोणत्याही पक्षाला सामील झाले नाहीत. त्याऐवजी त्यांनी 9 मार्च 2006 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाच्या पक्षाची स्थापना केली. लोकांना अजूनही राज ठाकरे यांचे शिवसेना सोडण्याबद्दलचे भाषण आठवतं. लोकांना अजूनही त्यांचे शब्द आठवतात की, ''माझा वाद माझ्या विठ्ठलाशी नसून त्याच्या सभोवतालच्या बडव्यांशी आहे."
प्रवास मनसेचा: मनसेची स्थापन केल्यानंतर राज ठाकरे यांनी सुरुवातीला निळा, केशर आणि हिरव्या रंगांचा झेंडा आणला. शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचा झंझावाती दौरा केला. मनसेला तरुणांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. मराठी माणसाच्या भल्याचा विचार करणारा पक्ष अशी शिवसेनेची असलेली ओळख पुसून ती जागा मनसेला कशी मिळेल, या दृष्टीने राज ठाकरे यांनी प्रयत्न सुरु केले. या प्रयत्नात त्यांना यशही मिळालं. पक्षाच्या स्थापनेनंतर झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 13 आमदार निवडून आले. त्यानंतर मनसेला अशा यशाची पुनरावृत्ती करता आली नाही. राज ठाकरे जे नेहमीच गर्दीला आकर्षित करतात, त्याचं रूपांतर ते मतांमध्ये करण्यात अपयशी ठरले. मनसे प्रभावाचे क्षेत्रही मुंबई आणि काही प्रमाणात नाशिकच्या पलीकडे गेले नाही. त्यातच सतत बदललेल्या राजकीय भूमिकांमुळे राज ठाकरे आणि त्यांचा मनसे पक्ष सर्वसामान्यांच्याही आलोचनेचा विषय ठरला.

वारंवार बदललेल्या भूमिकाः राज ठाकरे यांनी 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीआधी भारतीय जनता पार्टी आणि विशेष करून भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची वारेमाप प्रशंसा केली. जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवून दाखवण्याचं वचन मतदारांना देत त्यांनी विकासाचं मॉडेल म्हणजेच गुजरात मॉडेल असा प्रचार सुरु केला. नंतर मात्र त्यांचा भ्रमनिरास झाला. त्यानंतर कधी भाजपाच्या बाजूने, कधी विरोधात ते भूमिका घेत राहिले. त्यामुळे मतदारांमध्ये त्यांच्या भूमिकेबाबत संभ्रम कायम राहिला. त्यांनी सुरु केलेली टोलनाक्याविरोधातली आंदोलने, मराठी विरुद्ध उत्तर भारतीय संघर्षात घेतलेली आक्रमक भूमिका आदींमुळे हा अधिकच वाढला. अगदी आतासुद्धा शिवसेना आणि मनसे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत एकत्र .येणार अशी चर्चा सुरु असतानाच त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि भाजपान नेते देवेंद्र फडणवीस यांची एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भेट घेतली आणि 'आकलनास अवघड नेते' अशी स्वतःची ओळख कायम ठेवली.
पुण्यातील आदित्य-राजाच्या संयुक्त बॅनरच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा: गेल्या काही दिवसांपासून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार, अशी महाराष्ट्रात बरीच चर्चा आहे. या संभाव्य युतीबद्दल ठाकरेंच्या शिवसैनिकांमध्ये आणि मनसैनिकांमध्ये खूप उत्सुकता आहे. सध्या राज्यात युती आणि आघाड्यांचे वारे वाहत आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही बंधूंमध्ये युतीची चर्चा देखील आहे. दरम्यान, ठाकरे बंधूंच्या युतीच्या शक्यतेमुळे दोन्ही पक्षांमध्ये एक नवीन उत्साह संचारला होता. पुण्यात त्याचे पडसाद पाहायला मिळाले. मनसे नेते राज ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे एकाच बॅनरवर दिसत असून आदित्य ठाकरेंनी राज ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. गेल्या दोन दिवसांत मात्र चित्र पालटलं. ठाकरे बंधू एकतेची आशा हवेत विरते की काय, अशी परिस्थिती आहे. राज ठाकरे यांची नवी भूमिका अद्याप त्यांनी जाहीर केलेली नाही. राज ठाकरे यांच्या भूमिकेविषयी पुन्हा एकदा सर्वसामान्यांमध्ये संभ्रम आहे. निमित्त झालंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांनी घेतलेली भेट. राज यांनी मुख्यमंत्र्याबरोबर वांद्रे मुंबईतील एक पंचतारांकित हॉटेलमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा केली. ही चर्चा आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीबद्दल आहे, हे चाणाक्ष जनतेला वेगळं सांगण्याची गरज नाही.
महानगरपालिका निवडणुका: 2012 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला 10 महानगरपालिका महामंडळाच्या निवडणुकीत प्रचंड यश मिळालं. मनसेचे पहिले महापौर नशिकमध्ये जिंकले होते. पुणे शहरातही मनसे विरोधी पक्ष म्हणून उदयास आला. या व्यतिरिक्त मुंबई शहरात मतदानाची टक्केवारी लक्षणीय वाढलीय. वर्ष 2019 हे आणखी एक निवडणूक वर्ष होते, त्यानंतर मनसेनं सरकारांच्या आर्थिक धोरणांना जोरदार विरोध केला. परंतु जेव्हा जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्यात आलं, तेव्हा राज ठाकरे यांनी केंद्र सरकारचे अभिनंदन केले.
चित्रपटप्रेमी राज ठाकरे यांनी 'गांधी' चित्रपट 32 वेळा पाहिला: जे.जे. स्कूल ऑफ आर्टमधून राज ठाकरेंनी शिक्षणाचे धडे गिरवले. राज ठाकरे सकाळी महाविद्यालयीन शिक्षण घेतल्यानंतर मित्रांसह परिसरातील सिनेमागृहात जात असत. राज ठाकरे यांनी त्यावेळी 'गांधी' हा चित्रपट 32 वेळा पाहिला होता. चित्रपटसृष्टीतल्या कलावंतांचा राबता त्यांच्याकडे असतो. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतल्या जवळपास सर्वच दिग्गजांशी उत्तम संबंध ठेवणारे राज ठाकरे हे मोजक्या नेत्यांपैकी एक आहेत.
राज ठाकरेंनी केला मायकेल जॅक्सन शो आयोजित : 1996 मध्ये राज ठाकरे हे भारतीय विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष होते. त्यांच्या पुढाकाराने मायकेल जॅक्सन शोचं आयोजन मुंबईत करण्यात आलं. त्यावेळी हा कार्यक्रम चर्चेचा विषय झाला होता. राज ठाकरे यांच्या नेतृत्वात इतका मोठा कार्यक्रम आयोजित करण्याची ही पहिलीच वेळ होती.
राज ठाकरे आणि वाद : 23 जुलै 1996 रोजी पोलिसांना पुण्यातील अलका टॉकीजमध्ये मुंबईतील माटुंग्याचे रहिवासी असलेल्या रमेश किणी यांचा मृतदेह सापडल्यानंही खळबळ उडाली होती. किणीच्या मृत्यूच्या दुसऱ्याच दिवशी तत्कालीन विरोधी पक्षनेते असलेल्या छगन भुजबळांनी पत्रकार परिषद घेऊन राज ठाकरेंवर गंभीर आरोप केले होते. तेव्हा भुजबळांसोबत या पत्रकार परिषदेला रमेश किणींच्या पत्नी शीला किणी होत्या. शीला किणींनी भर पत्रकार परिषदेत राज ठाकरेंचं नाव घेतलं, त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात तो चर्चेचा विषय ठरला. दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि पक्षाच्या इतर सदस्यांविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकाकर्त्याने निवडणूक आयोगाकडे मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणीही केली होती. महाराष्ट्रात मराठी भाषा न बोलणाऱ्या उत्तर भारतीयांना मारहाण आणि धमक्या देण्याच्या अनेक प्रकरणांमध्ये कारवाईची मागणी करणारी याचिका मनसेविरुद्ध दाखल केली होती. एकंदरीत राज ठाकरे आणि वाद हे समीकरण महाराष्ट्राला काही नवं नाही.
पुढे काय? : राज ठाकरे हे त्यांच्या आणि पर्यायाने त्यांच्या पक्षाच्या राजकीय कारकिर्दीच्या अतिशय महत्त्वाच्या वळणावर आहेत. इथून पुढे त्यांनी घेतलेले निर्णय दूरगामी परिणाम करणारे ठरतील, याची त्यांना जाणीव आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची दशा आणि दिशा त्यांनाच ठरवायची आहे. सर्वात महत्त्वाचं. 'मराठी माणसाचा हक्काचा नेता' ही ओळख टिकवून ठेवायची आहे. कारण राज ठाकरे यांच्या पक्षाकडे एकही लोकप्रतिनिधी नसला तरी आजही मराठी माणसाच्या मनात त्यांच्याबद्दल हळवा कोपरा आहे.
हेही वाचाः
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एन्ट्री; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
बाहेरून येणाऱ्या लोंढ्यांमुळे रेल्वे कोलमडली, मुंबईसाठी एक वेगळं महामंडळ हवं - राज ठाकरे

