ETV Bharat / state

आमिर खान आणि जावेद अख्तर मराठीत बोलतात का? नितेश राणेंचं मनसेला प्रत्युत्तर

जावेद अख्तर आणि आमिर खान मराठी बोलतात का? मग एका गरीब हिंदूला मारहाण का करण्यात आली? असं म्हणत नितेश राणेंनी मनसेवर जोरदार पलटवार केलाय.

State Fisheries and Ports Development Minister Nitesh Rane
राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे (Source- ETV Bharat)
author img

By PTI

Published : July 4, 2025 at 2:50 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई- मराठी बोलण्यास नकार दिल्याबद्दल मीरा रोडमधील एका दुकान मालकावर झालेल्या कथित हल्ल्यावरून राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी शुक्रवारी मनसेवर निशाणा साधला. मराठी न बोलल्यामुळे फक्त हिंदूंनाच लक्ष्य केले जाते, असा आरोप करीत नितेश राणे यांनी गीतकार जावेद अख्तर आणि अभिनेता आमिर खान मराठी बोलू शकतात का? असा प्रश्न विचारला. जावेद अख्तर आणि आमिर खान मराठी बोलतात का? मग एका गरीब हिंदूला मारहाण का करण्यात आली? असं म्हणत नितेश राणेंनी मनसेचे संदीप देशपांडेवर जोरदार पलटवार केलाय.

मराठी न बोलल्यावरून दुकानदाराला मारहाण : मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्र्यांचे हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काही लोकांनी मराठी न बोलल्याबद्दल एका व्यक्तीला मारहाण केली होती. या लोकांनी ठाण्यातील भाईंदरमध्ये एका व्यक्तीला मारहाण केल्याचा आरोप आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये असे दिसून आले आहे की, मनसेच्या लोकांनी दुकान मालकाला हिंदीत बोलल्यानंतर राज्यात कोणती भाषा बोलली जाते, असे विचारले. तर दुकान मालकाने 'सर्व भाषा'बोलल्या जात असल्याचं उत्तर दिलं, त्यानंतर त्याला मारहाण करण्यात आली. त्यानंतर नितेश राणेंनीही यावर जोरदार प्रहार केलाय.

हिंदूंना लक्ष्य केले जात आहे : माजी खासदार राजन विचारेंच्या इथलाही एक व्हिडीओ पाहिलाय, तिथेही एका हिंदूला मारलंय. एवढी ढुंगणात ताकद आहे ना, मग मोहम्मद अली रोड आणि नळ बाजार, भेंडी बाजारमध्ये दाढी आणि गोल टोपीवाल्याला कानफाटात मारा ना? ढुंगणात ताकद आहे ना तुमच्या, ते काय शुद्ध मराठी बोलतात की काय? त्यांच्या थोबाडातून आम्ही कधी मराठी ऐकलं नाही, अल्लाहू अकबर सोडून. मग तिथे का नाही त्यांचे थोबाड फोडायची हिंमत करीत. तिथे का नाही एका फेरीवाल्याला पकडत, असं आव्हानही नितेश राणेंनी मनसेला दिलाय.

..तर आमचं सरकार तिसरा डोळा उघडेल : आमच्या कुठल्याही हिंदूला अशा पद्धतीनं कोण मारत असेल, तर आमचं सरकार नक्कीच कारवाई करणार, हे हिंदूंनी बसवलेलं सरकार आहे. हिंदुत्वाच्या विचारांचं सरकार आहे. त्यांना मी माझी गाडी देतो, जा नळ बाजारात उभे राहा, तिकडचे फेरीवाले आणि मटण विक्रेते मराठीमध्ये बोलतात काय ते पाहा? तिथे आपली हिंमत दाखवायची नाही. तिथे जाऊन सांगा मराठीत बोलो, मग कुठून अजान काढतील ते दिसेल. आम्ही तिथेही बोलण्याची हिंमत ठेवतो. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारात चालणारे शिवसैनिक आहेत ना हे नळ बाजारात जाऊन कानफाडवतील आणि त्या लोकांच्या तोंडातून मराठी काढतील. गरीब हिंदूंना मारणार नाहीत. अशा पद्धतीचे प्रकार वारंवर हिंदूंवर होत असल्यास आमचंही सरकार तिसरा डोळा उघडेल हे त्यांनी लक्षात ठेवावं, असा इशाराही नितेश राणेंनी दिलाय.

महाराष्ट्रात भाषेवरून वाद सुरू : मराठी भाषेत बोलण्यावरून गेल्या काही काळापासून महाराष्ट्रात असे प्रकार समोर येत आहेत. मनसेचे कार्यकर्ते आक्रमक भूमिका घेत असून, मारहाणीचे प्रकार वाढत आहेत. या वर्षी एप्रिलमध्ये मुंबईतील पवई येथे मनसे कार्यकर्त्यांनी एका खासगी सुरक्षारक्षकाला मराठीत कसे बोलायचे हे माहीत नसल्यामुळे त्याला मारहाण केल्याचा आरोप आहे.

हेही वाचा