जीएसटी नसलेल्या महिला बचत गटांच्या दिवाळी फराळाची लोकप्रियता शिखरावर, घरगुती चव स्वस्त दर आणि रोजगाराची संधी
महिला बचत गटांच्या दिवाळी फराळाची लोकप्रियता खूपच वाढलेली आहे. जीएसटी नाही तसंच घरगुती चव, स्वस्त दरात हा फराळ मिळत आहे. महिलांनाही रोजगार मिळतोय.

Published : October 11, 2025 at 11:57 PM IST
ठाणे : दिवाळी म्हटली की फराळ आलाच. मात्र आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत घरी फराळ तयार करणे सर्वांना शक्य होत नाही. परिणामी, तयार (रेडीमेड) फराळाच्या पदार्थांना मोठी मागणी असते. यंदा मात्र दुकानांमधील फराळाच्या पदार्थांवर १२% जीएसटी आकारला जात असल्यामुळे प्रतिकिलो सुमारे ४० रुपयांपर्यंत दरवाढ झाली आहे. याउलट बचत गटांमार्फत बनवलेल्या घरगुती फराळावर जीएसटी लागू न झाल्यामुळे हे पदार्थ स्वस्तात उपलब्ध होत असून नागरिकांचा कल याच घरगुती फराळ घेण्याकडे वाढला आहे.

ठाण्यातील “जय जय रघुवीर समर्थ” आणि “सावित्री” या दोन महिला बचत गटांनी यंदा दिवाळीनिमित्त पारंपरिक फराळ तयार केला असून, ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमात बचतगटाकडून ५०० किलोहून अधिक फराळ तयार केला असून त्यासाठी जवळपास ५० हून अधिक महिला मेहनत घेत आहेत. गेल्यावर्षी या महिलांनी जवळपास 400 किलो फराळाची विक्री केली होती. मात्र यंदा मागणी वाढल्याची माहिती महिला बचत गटाने दिली.

महिला बचत गटातील महिलांनी भाजणी चकली, पोहे चिवडा, शंकरपाळी, लाडू, करंजी आदी पारंपरिक पदार्थ ₹२०० ते ₹५०० प्रति किलो दराने विक्रीस ठेवले आहेत. कमी दर, घरगुती चव आणि दर्जेदार तयारी यामुळे हॉटेल व्यावसायिक, राजकीय नेते, नोकरदार वर्ग तसेच सामान्य नागरिक यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर ऑर्डर्स घेतल्या जात आहेत. विशेष म्हणजे, मायभूमीपासून दूर असलेल्या परदेशातील नागरिकांना या घरगुती फराळातून गावाकडच्या चवीचा आणि दिवाळीच्या आठवणींचा आनंद घेता येत असल्यामुळे या उपक्रमाला विशेष लोकप्रियता मिळत आहे.

या महिला बचत गटात नामदेव वाडी, सिद्धेश्वर तलाव, पाटील वाडी, रमाबाई नगर या भागातील महिलांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. या महिलांनी राज्य सरकारकडून मिळणाऱ्या लाडक्या बहीण योजनेचे दीड हजार रुपये बचत गटात गुंतवले आहेत. त्याच पैशातून त्यांनी हा व्यवसाय निर्माण केला असून इतर महिलांना देखील रोजगार उपलब्ध करून दिला. "रोजगारासाठी मुंबईकडे पाहण्याऐवजी, स्वतः काही तरी निर्माण करा आणि इतर महिलांनाही रोजगार द्या" असा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या संदेशातून प्रेरणा मिळाली असे महिलांनी सांगितले.

“दसरा, दिवाळी, गणेशोत्सव अशा विविध सणांच्या निमित्ताने आम्ही नवनवीन उपक्रम राबवत आहोत. यामधून महिलांना आर्थिक स्थैर्य मिळत असून आत्मविश्वास देखील वाढतोय. - जया कुंभेकर, बचत गटातील भगिनी

“गेल्या १० वर्षांपासून आम्ही नागरिकांना दर्जेदार सेवा देत आहोत. महिलांनी अशा उपक्रमांमध्ये सहभागी होऊन स्वतःसाठी आणि इतरांसाठी रोजगाराची दारे खुली करावीत.” - सदस्य सुवर्ण खेरटकर

