मुंबई : मुंबई रेल्वे लोकल ही मुंबईची जीवनवाहिनी समजली जाते. या लोकलकडं लाईफलाईन म्हणून पाहिलं जाते. परंतु आता हीच लाईफलाईन डेथलाईन होते की काय? अशी शंका चाकरमान्यांना येत आहे. आज उपनगरीय कसारा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडं येणाऱ्या लोकलमधून ८ जण खाली पडून मोठा अपघात घडला. यात 5 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त काही माध्यमांनी दिलं आहे. तर अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
दिवा ते मुंब्रा दरम्यान घडली घटना : ही घटना उपनगरीय रेल्वे स्थानक दिवा ते मुंब्रा या दरम्यान घडली. कसारावरुन सीएसएमटी येणाऱ्या लोकलच्या गेटवर काही प्रवासी लटकत होते. याचवेळी दुसरी ट्रेन आली आणि दोन्हीकडील ट्रेनमधील प्रवासी एकमेकांना घासले गेल्यानं 13 प्रवासी खाली पडले. यातील ८ जणांना सध्या कळव्यातील छत्रपती शिवाजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. यात चौघांची स्थिती गंभीर असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ स्वप्नील नीला यांनी दिली आहे.
मृत्यूचा अधिकृत आकडा समोर आलेला नाही : घटना घडल्यानंतर सर्वत्र हळहळ आणि शोक व्यक्त केला जात आहे. एकीकडं मुंबईतून केंद्र सरकारला रेल्वेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात महसूल दिला जातोय. पण त्या बदल्यात मुंबईकरांसाठी कोणत्या सुविधा मिळतात का? हाच संतप्त सवाल मुंबईकर उपस्थित करत आहेत. तर या घटनेनंतर सर्व क्षेत्रातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. दुसरीकडं "या घटनेत ८ जणांवरती उपचार सुरू असून ४ जणांची प्रकृती अतिशय गंभीर आहे. मात्र अद्यापपर्यंत अधिकृत मृतांचा आकडा समोर आलेला नाही," अशी माहिती डॉ. स्वप्नील नीला यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.