ETV Bharat / state

बाहेरून येणाऱ्या लोंढ्यांमुळे रेल्वे कोलमडली, मुंबईसाठी एक वेगळं महामंडळ हवं - राज ठाकरे

राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर होते. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांची बैठक पुण्यात आयोजित करण्यात आली होती.

Raj Thackeray
राज ठाकरे (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : June 9, 2025 at 7:28 PM IST

|

Updated : June 9, 2025 at 8:38 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

पुणे : आज सकाळी मुंबईतील कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडं (सीएसएमटी) येणाऱ्या लोकलमधून 13 प्रवासी खाली पडून मोठा अपघात घडला. दिवा आणि मुंब्रा स्थानकादरम्यान गर्दीमुळे लोकल ट्रेनमधून पडून 4 प्रवाशांचा मृत्यू झाला. दरम्यान, याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, "आज जो रेल्वे अपघात झाला तो दुर्दैवी आहे. पण मुंबईत रोजच रेल्वे अपघात होत आहेत. असा एकही दिवस जात नाही की, ज्यामध्ये अपघात होत नाही. कोणाचा हात जातो कोणाचा पाय जातो. मग प्रश्न असा आहे की, रेल्वे चालती कशी? हे जगाला एक आश्चर्यच आहे, " असं यावेळी राज ठाकरे यांनी सांगितलं.

मुंबई रेल्वेसाठी एक महामंडळ करा : राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर होते. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांची बैठक पुण्यात आयोजित करण्यात आली होती. यावेळी राज ठाकरे म्हणाले की, "मुंबई रेल्वेसाठी एक महामंडळ करा, ही मागणी अनेक वेळा मुंबईतल्या लोकांनी केंद्र सरकारकडं केली. मुंबईच हे रेल्वे मंडळच वेगळं करा, या गोष्टींकरता अजूनही काहीच होत नाही. आता हा फक्त रेल्वे पुरता मर्यादित विषय नाही. यानिमित्ताने आपल्या शहरांचं काय झालं, याकडे पाहिलं पाहिजे. आपल्या सगळ्या शहरांचा विचका झालेला आहे. रिडेव्हलोपमेंटच्या नावाखाली रस्ते नाहीत, फक्त उंच उंच इमारती उभा राहत आहेत. रस्ते नसल्यामुळं पार्किंगची व्यवस्था नाही आणि त्यामुळं वाहतुकीची समस्या निर्माण होत आहे."

बाहेरून येणाऱ्या लोंढ्यांमुळेच रेल्वे कोलमडली : "मुंबई, पुणे, ठाणे या शहरांमध्ये जर कुठे आग लागली तर फायरचा बंब सुद्धा जाऊ शकत नाही, अशी आपल्या सगळ्या शहरांची अवस्था झालेली आहे. टाऊन प्लॅनिंग नावाची गोष्टच आपल्याकडं नाही. मी अनेक वर्षांपासून सांगतोय बाहेरून येणारे जे लोंढे आपल्या शहरावर आदळत आहेत. याच बाहेरून येणाऱ्या लोंढ्यांमुळेच आपली रेल्वे कोलमडली आहे. रेल्वेचा बोजवारा उडाला आहे. वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. लोकांना चालायला फुटपाथ नाही, वाहनांसाठी रस्ते नाहीत. कोण येतंय, कोण जातंय, काहीच माहीत नाही. फक्त मेट्रो आणि मोनोरेल यांनी प्रश्न सुटणार नाहीत. मुंबईमध्ये या सगळ्या सुविधा आहेत, मग गाड्यांचं रजिस्ट्रेशन थांबलं का? मग या मेट्रो, मोनोरेल कोण वापरत आहे? कोण येतंय कोणीच पाहायला तयार नाही. सगळे जण निवडणुका प्रचार यांच्यातच गुंतलेळले आहेत. शहर म्हणून कोणी बोलायला तयार नाही," असं राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे यांची प्रतिक्रिया (ETV Bharat Reporter)

केंद्र सरकारनं तातडीनं लक्ष दिलं पाहिजे : याचबरोबर, राज ठाकरे-उद्धव ठाकरे युती करणार का? या प्रश्नापेक्षा आज मुंबईत प्रवास कसा होतोय? शहरांमध्ये आणि एकूणच राज्यात लोकं कशा अवस्थेत जगत आहेत? हे प्रश्न अधिक महत्त्वाचे आहेत, असंही राज ठाकरेंनी म्हटलं. ते म्हणाले की, "गेले अनेक दिवस राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार याच्या बातम्या जेवढ्या काळ लावल्या, तेवढ्या काळ हे जे मृत्यू झाले आहेत. तुम्ही बातम्या लावणार आहात का? आज आपण कशाला महत्त्व द्यायचं हेच समजेनास झालं आहे. केंद्र सरकारनं याकडं तातडीनं लक्ष दिलं पाहिजे. मीही कॉलेजला असताना दोन वर्ष हार्बरनं प्रवास करायचो त्यामुळं मला माहीत आहे. रेल्वेचा प्रवास काय असतो आणि प्लॅटफॉर्मवर काय गर्दी असते? ," असं यावेळी राज ठाकरे म्हणाले.

देशात माणसांची किंमतच नाही : दरम्यान, या अपघातानंतर मदतकार्य लवकर पोहोचलं नाही, याबाबत राज ठाकरे यांना विचारलं असता, ते म्हणाले की, "आपल्या देशात माणसांची किंमतच नाही. हीच गोष्ट जर जगात दुसरीकडं कुठं घडली असती तर तिथे ती कशी हाताळली गेली असती? आपल्याकडे मात्र काहीही नाही. आपले सगळे मंत्री संत्री परदेशात जातात जग बघून येतात. ते नक्की काय घेऊन येतात.. तिकडची रेल्वे आणू नका. पण निदान विचार तरी घेऊन या," असंही राज ठाकरे म्हणाले.

हेही वाचा :

  1. मुंबईच्या घाटकोपरमध्ये पुन्हा एकदा मराठी अन् गुजराती वाद, मराठी कुटुंबाला गुजराती कुटुंबाकडून मारहाण
  2. आता लोकलमध्येही असणार स्वयंचलित दरवाजे; प्रवाशांच्या मृत्यूनंतर रेल्वे बोर्डाचा महत्त्वाचा निर्णय
  3. ऊसाच्या पट्ट्यातील केळीची लागली इराणला गोडी : राहात्याच्या केळीला विदेशी बाजारपेठेत मिळतो चांगला भाव
Last Updated : June 9, 2025 at 8:38 PM IST