"महायुती सरकारनं मुंबई आणि महाराष्ट्र अदानी समूहाला गहाण ठेवला आहे का?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
राज्य सरकार अदानी उद्योग समूहासाठी महाराष्ट्राला उद्ध्वस्त करत असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली आहे.


Published : June 5, 2025 at 3:59 PM IST
|Updated : June 5, 2025 at 5:06 PM IST
नागपूर : कुर्ला येथील २१ एकरची जागा राज्य सरकारनं अदानी उद्योग समूहाला देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी अटी, शर्ती देखील शिथिल केल्या आहेत. संपूर्ण मुंबईतील अनेक महत्वाचे भूखंड अदानी समूहाला देण्यात आले आहेत. राज्य सरकार अजून किती जमीन यांना देणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. महायुती सरकारनं महाराष्ट्र आणि मुंबई अदानी समूहाला गहाण ठेवली आहे का? असा संतप्त सवाल काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. ते आज नागपुरात बोलत होते.
मोक्याच्या जागा अदानी उद्योग समूहाला : मुंबईतील धारावी प्रकल्पासाठी अदानी समूहाला मुंबईतील जमिनीची खैरात वाटण्यात येत आहे. धारावी पुनर्वसनाचं नाव पुढं करून अगदी मोक्याच्या जागा अदानी उद्योग समूहाला देण्याचं काम सरकार करत आहे. या मोक्याच्या ठिकाणी टॉवर उभे केले जाणार आहेत. मात्र, हे सरकार धारावीकरांसाठी जमीन दिल्याचे सांगत आहे. हे खोट आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला. तसंच राज्य सरकार अदानी उद्योग समूहासाठी महाराष्ट्राला उद्ध्वस्त करत असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली आहे.
जातीनिहाय जनगणनेची प्रक्रिया यावर्षी पासून सुरू करावी : देशात जनगणना होणार आहे. पुढील वर्षी मार्च 2027 पासून जनगणनेच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. यावेळी जातीनिहाय जनगणना देखील करण्यात येणार आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जातीनिहाय जनगणनेची मागणी लावून धरली होती. त्यानंतर सरकारनं निर्णय घेतला आहे. आता सरकारनं 2027 मध्ये जनगणनेची प्रक्रिया सुरू करणार ही घोषणा केली आहे. निवडणुकीत ओबीसी समाजाची मतं घ्यायची पण त्यांच्याकडं भाजपा दुर्लक्ष करतंय. आता देखील 2029 ची निवडणूक समोर ठेवून जुमलेबाजी सरकारनं करू नये, जातीनिहाय जनगणना करायची असेल तर सरकारनं याचवर्षी ती प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली.
ड्रग्स आणि बोगस बियाणं गुजरातमधूनचं का येतात? : राज्यात अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं आहे. त्यात बोगस बियाणांमुळं शेतकऱ्यांना अजून फटका बसेल, याकडं लक्ष देण्याची राज्य सरकारची जबाबदारी आहे, असं वडेट्टीवार म्हणाले. तसंच, राज्यात ड्रग्स आणि बोगस बियाणं हे गुजरातमधूनचं का येतात? हा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा :

