धुळे -शहरातील मनोहर चित्रमंदिर परिसरात आमदार अनुप अग्रवाल यांच्या संकल्पनेतून शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक साकारण्यात येतंय. पण आता या स्मारकावरून नवा वाद निर्माण झाला आहे. आमदार अनुप अग्रवाल यांनी या स्मारकासाठी मोक्याची जागा हडपल्याचा आरोप धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन केला. यावरून शहरातील राजकारण चांगलंच तापलं आहे.
अनिल गोटे काय म्हणाले?- आमदार अनुप अग्रवाल यांच्या संकल्पनेतून साकारण्यात येणाऱ्या या स्मारकाचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान, या स्मारकासाठी लागणारी बाजारपेठेतील 75 कोटी रुपयांची जागा आमदार अनुप अग्रवाल यांनी हडप केल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला. पत्रकार परिषदेत बोलताना गोटे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा नवीन पुतळा चबुतरावर उभारला जात असल्याचं सांगत हा चबुतरा चुकीच्या पद्धतीने उभारल्याचा दावा केला. " भविष्यात या चबुतऱ्याचा गैरवापर होणार आहे. यामुळे आपण आक्षेप घेत आहोत. आपला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध नाही, तर या चबुतऱ्याला विरोध आहे. त्यामुळेच या विरोधात न्यायालयात दाद मागितली आहे. आपण स्वतः न्यायालयात हा खटला लढवणार आहोत,"अशी त्यांनी माहिती दिली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या नावाखाली कोणत्याही परिस्थितीत जागा हडप करू देणार नाही. मी मरणाला घाबरणारा माणूस नाही. लोकांना भडकावण्याचे धंदे बंद करा- अनिल गोटे, माजी आमदार
अनुप अग्रवाल यांचं प्रत्युत्तर- अनिल गोटेंच्या या आरोपांबाबत आमदार अनुप अग्रवाल यांना विचारलं असता, त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. अग्रवाल म्हणाले, की "त्यांना स्वप्न पडलंय, 75 कोटींचा आकडा कुठून आला? जागा हडप कोण करतंय? त्यांना कुणी सांगितलं जागा हडप होत आहे, असे प्रतिप्रश्न अग्रवाल यांनी गोटेंना केले. शिवतिर्थाच्या बाजूला त्यांनी त्यांचं ऑफिस बांधलं होतं, ते प्रशासनानं तोडलं, याची आठवणही अग्रवाल यांनी करून दिली. गोटे हे स्वत: प्रमाणंच इतरांनाही समजतात. त्यांची निती आणि प्रवृत्तीच तशी असल्याचं प्रत्युत्तर अग्रवाल यांनी दिलं.