शिर्डी : शनिवारी (12 एप्रिल) देशभरात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. भारतातील प्रत्येक राज्यात हनुमान जयंती वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या पद्धतीनं साजरी केली जाते. शिर्डीतील साई मंदिरात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. तसेच यावेळी शक्तीचं प्रतिक असलेल्या 125 किलो वजनाचा बजरंग गोटा उचलण्याची स्पर्धा पार पडली.
साईबाबांच्या शिर्डीत हनुमान जयंती : हनुमान जयंती निमित्तानं शिर्डीतील क्रांती युवक मंडळाच्या वतीनं सालाबादप्रमाणं यंदाही हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. क्रांती युवक मंडळाकडून दरवर्षी शिर्डीच्या साई मंदिराजवळील हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सव उत्सव मोठ्या भक्तीभावात साजरा करण्यात आला. शनिवारी पहाटे साडे सहा वाजता हनुमानाच्या मूर्तीला गंगेच्या पाण्यानं मंगलस्नान घालण्यात आलं. त्यानंतर हनुमानाची महाआरती करून भक्तांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं.
बजरंग गोटा उचलण्याची स्पर्धा : मंदिर परिसरात 125 किलो वजनाचा बजरंग गोटा उचलण्याची स्पर्धा पार पडली. स्पर्धेच्या सुरूवातीला शिर्डी ग्रामस्थांच्या हस्ते बजरंग गोटाचं पूजन करण्यात आलं. यावेळी परिसरातील तरुणांनी मोठ्या जोशात 'जय श्रीराम' आणि हनुमानाचा जयजयकार करत गोटा उचलण्याचा प्रयत्न केला. मात्र, येथील 22 तरुणांनी हा 125 किलो वजनाचा बजरंग गोटा उचलला. शेवटी मंडळाचे अध्यक्ष सचिन तांबे यांनी गोटा उचलून स्पर्धेचा समारोप केला.
साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी : हनुमान जयंती आणि रविवारची सुट्टी जोडून आल्यानं शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. हनुमान जयंती निमित्ताने साईबाबांच्या मूर्तीला कोट्यवधी रुपयांचे दागिने घालण्यात आले होते. तसेच साईबाबांच्या दुपारच्या मध्यान्ह आरतीच्या वेळी साईबाबांच्या समाधीसमोर बाल हनुमानाची प्रतिमा ठेवण्यात आली होती.
हेही वाचा -