शिर्डीः साईबाबा संस्थानच्या वतीने शिर्डीत साजरा करण्यात आलेल्या तीन दिवसीय रामनवमी उत्सवात भाविकांना भरभरून दान केलंय. तीन दिवसांत तब्बल 4 कोटी 26 लाख रुपये भाविकांनी साई चरणी अर्पण केलेत. तर अडीच लाखांहून अधिक भाविकांनी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतलंय. मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी तब्बल 50 लाखांनी साईंच्या दानात वाढ झालीय. शिर्डी साईबाबा संस्थानच्या वतीनं यंदाच्या वर्षी 114 वा श्रीरामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय.
भाविकांनी साईबाबांना भरभरून दानही केलंय : या तीन दिवसाच्या दरम्यान अडीच लाख भाविकांनी शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले आहे. तसेच या दरम्यान भाविकांनी साईबाबांना भरभरून दानही केलंय. यामध्ये साई मंदिरातील देणगी काऊंटरवर 79 लाख 38 हजार 830 रुपये देणगी दिलीय. तसेच व्हीआयपी पासेसच्या माध्यमातून 47 लाख 16 हजार 800 रुपये प्राप्त झालेत. मंदिर परिसरातील दक्षिणा पेटीत 1 कोटी 67 लाख रुपये भाविकांनी दान दिलेत. तसेच जे भाविक शिर्डीला येऊ शकले नाही अशा भाविकांनी चेक, डीडी, मनी ऑर्डर, ऑनलाईनच्या माध्यमातून तब्बल 1 कोटी 24 लाख 15 हजार रुपये दान केलेत.
पाच देशांतील विदेशी चलनही प्राप्त : तसेच 6 लाख 15 हजार 782 रुपयांचे 83 ग्रॅम वजनाचे सोनेही भाविकांनी दान दिलंय. त्याच बरोबर 2030 ग्रॅम वजनाचे 1 लाख 31 हजार 478 रुपयांची चांदीही भाविकांनी दान केलीय. तसेच पाच देशांतील विदेशी चलनही प्राप्त झालेय. मागील 2024 वर्षीच्या रामनवमी उत्सवाच्या तीन दिवसांत 3 कोटी 89 लाख रुपय भाविकांनी दान केले होते. तसेच यंदाच्या 2025 च्या रामनवमी उत्सवाच्या तीन दिवसांत 4 कोटी 26 लाख रुपये भाविकांनी दान स्वरूपात दिलेत. मागणी वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी तब्बल 50 लाखांनी साईंच्या दानात वाढ झालीय.
हेही वाचाः
कर्मचाऱ्यांच्या हत्याकांडानंतर साईबाबा संस्थानात नव्या नियमाची अंमलबजावणी सुरू
साईचरणी तब्बल 'इतक्या' लाखांचा सुवर्ण मुकुट अर्पण; पाहा व्हिडिओ