मुंबई - 'छत्रपती शिवाजी महाराज भारत गौरव पर्यटन रेल्वे' मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी हिरवा झेंडा दाखविला. ही रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून सकाळी साडेसहा वाजता रवाना झाली आहे.
आयआरसीटीसी (IRCTC), रेल्वे मंत्रालय, आणि राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष पाच दिवसांची सफर घडविणारी रेल्वे आजपासून विशेष रेल्वे सुरू करण्यात आली आहे. या रेल्वेमधून पर्यटकांना राज्याच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठिकाणांना भेट देता येणार आहे. या रेल्वेतील पर्यटकांना रायगड किल्ला, शिवनेरी किल्ला, प्रतापगड किल्ला, पन्हाळा किल्ला, लाल महाल, कसबा गणपती आणि शिवसृष्टी या ठिकाणांना भेट देता येणार आहे.
रेल्वेला हिरवा झेंडा दाखविल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले," छत्रपती शिवाजी महाराजांनी 351 वर्षापूर्वी देश, देव आणि धर्माची लढाई जिंकली. स्वदेश, स्वराज्य आणि स्वभाषा या त्रिसूत्रीनं हिंदवी स्वराज्याची स्थापना त्यांनी केली. तोच आजचा दिवस आहे. त्यामुळेच आज आपलं अस्तित्व आहे. अतिशय पवित्र दिनी गौरव रेल्वे अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज सर्किट सुरू केलं आहे. जिथे-जिथे शिवाजी महाराजांची पावले इतिहासात उमटली, तिथे रेल्वे जाणार आहे. रेल्वेत 710 प्रवासी आहेत, तर त्यामध्ये 150 हून अधिक महिला आहेत. भारताचा गौरव आणि प्रेरणा यासाठी तरुणाई रेल्वेतून जात आहे. राज्यातील सर्व भागातील प्रवासी आहेत. ही चांगली रेल्वे सुरू केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा आभारी आहे."
भारत गौरव पर्यटन रेल्वेचं १०० टक्के बुकिंग झालेलं आहे. प्रवाशांची सर्व सुविधा रेल्वे विभागानं केली आहे. रेल्वेतील 80 टक्के प्रवासी हे 40 वर्षांहून कमी वयाचे आहेत. या रेल्वेतून शिवरायांचा इतिहास आणि वारसा दाखविण्याचा प्रयत्न आहे-मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस
- ही यात्रा प्रवाशांना शिवरायांच्या जीवनातील महत्त्वाच्या टप्प्यांचा आणि त्यांच्या शौर्याचं स्मरण करून देणार आहे. रेल्वेमधून मिळणाऱ्या सोयीसुविधा, सांस्कृतिक समृद्धी आणि सहजतेवर भर देणारी ही रेल्वे प्रवाशांसाठी अविस्मरणीय अनुभव ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा-