मुंबई : दरवर्षीप्रमाणे यंदाही छठ पूजा मोठ्या थाटामाटात मुंबईतील अनेक चौपाटींवर साजरी केली जात आहे. त्यात जुहू चौपाटी हे नेहमी प्रमुख आकर्षण असतं. आज (8 नोव्हेंबर) पहाटे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छठ पूजेनिमित्त जुहू इथं हजेरी लावली. तसंच यावेळी त्यांनी भाविकांना छठ पूजेच्या शुभेच्छा दिल्या.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? : यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मी जुहूला छठ पूजेसाठी आलोय. छठ व्रत ठेवणाऱ्या आमच्या माता, भगिनी, बंधू हे सर्व या ठिकाणी मोठ्या संख्येनं येत असतात. यावेळी छठ मातेला नमन केलं जातं. छठ मातेसाठी 36 तासांचा निर्जल असा उपवास माता भगिनी करतात. तसंच भगवान सूर्यदेव ज्यांना आपण असीम ऊर्जेचे अधिपती मानतो, त्या सूर्य देवाला अर्घ्य दिला जातो आणि अतिशय ऊर्जा पूर्ण असं हे पर्व आहे. विशेषत: उत्तर भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे पर्व साजरं केलं जातं. परंतु, आज महाराष्ट्रात सुद्धा अनेक ठिकाणी हे पर्व साजरं होताना दिसतंय. मी छठी मातेला आणि भगवान सूर्य देवाला या ठिकाणी एवढीच प्रार्थना करतो की, आपल्या देशाला आणि महाराष्ट्राला उंचावर नेण्यासाठी त्यांनी ऊर्जा द्यावी. आपल्या माता भगिनींची जी काही मनोकामना आहे, ती त्यांनी पूर्ण करावी. इथं आल्यानंतर एक वेगळी ऊर्जा अनुभवायला मिळते", असंही फडणवीस म्हणाले.
सूर्याला अर्घ्य देऊन महिला व्रताची सांगता : उत्तर भारतीयांसाठी छठपूजा ही एक पर्वणी असते. दरवर्षीप्रमाणे यंदाही जुहू चौपाटीवर छठ पूजा मोठ्या थाटामाटात साजरी केली गेली. मुंबई तसंच उपनगरातील हजारो भाविक या निमित्तानं जुहू चौपाटीवर जमा झाले आहेत. मावळतीला आणि उगवत्या सूर्याला अर्घ्य देऊन महिला आपल्या व्रताची सांगता करतात, ही पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे.
पंतप्रधान मोदींचं महाराष्ट्रात स्वागत : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज महाराष्ट्रात सभा होत आहेत. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "निवडणुका सुरू झाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आमचे सर्वोच्च नेते आहेत. महाराष्ट्रात आज आम्ही त्यांचं स्वागत करू. महाराष्ट्रातील निवडणुकीत मोदीजी आमच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवतील, ज्यानं आम्हाला त्याचा फायदा होईल." दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज धुळे आणि नाशिक येथे सभा घेणार आहेत.
हेही वाचा -