सातारा : मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरचा जूना पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. तसंच पूल दुर्घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. ते दरे (ता. महाबळेश्वर) इथं माध्यमांशी बोलत होते.
इंद्रायणी नदीवरील पुलाची दुर्घटना वेदनादायी : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "मावळ तालुक्यातील कुंडमळा हे एक महत्त्वाचं पर्यटनस्थळ आहे. त्या ठिकाणच्या इंद्रायणी नदीवरील जुना लोखंडी पूल पडल्यामुळे झालेल्या दुर्घटनेची माहिती आपण जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतली आहे. घटना अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. 38 लोकांना एनडीआरएफच्या रेस्क्यू टीमनं सुरक्षितपणे बाहेर काढलं आहे. त्यांना स्थानिक लोक ही मदत करत आहेत, बचाव कार्य सुरू आहे."
लोकांना शोधून काढण्यास प्राधान्य : पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून सहा लोक जखमी असल्याची माहितीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. जखमींवर उपचार करून त्यांचा जीव वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जे लोक दुर्घटनेत सापडले आहेत, त्यांना लवकरात लवकर शोधून काढण्यास प्रशासनाचे प्राधान्य असल्याचंही त्यांनी सांगितलं.
जुन्या पुलांचं होणार स्ट्रक्चरल ऑडिट : "इंद्रायणी नदीवरील पुलांसारख्या सर्व जुन्या पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले. तसंच या दुर्घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल," असंही त्यांनी यांनी स्पष्ट केलं.
नवीन महाबळेश्वर विकास आराखड्याचा आढावा : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवीन महाबळेश्वर गिरिस्थान क्षेत्र आराखड्याचा रविवारी दरे या आपल्या मूळ गावी आढावा घेतला. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच 1153 चौरस किलोमीटरमध्ये नवीन महाबळेश्वर गिरिस्थान क्षेत्र घोषित करण्यात आलं आहे. यामध्ये महाबळेश्वर, पाटण, जावळी आणि सातारा या चार तालुक्यातील 265 गावांचा समावेश आहे. महाबळेश्वर विभागामध्ये 30 जावळीत 33 सातारा 27 आणि पाटणमध्ये 57 असे एकूण 147 पर्यटक नंदनवन प्रस्तावित आहेत.
पर्यटकांना मिळणार खास पर्वणी : पर्यटकांना सुविधा, सुरक्षिततेबरोबरच प्रवासापासून आरामदायी निवास आणि जेवणाचे पर्याय पर्यटक नंदनवनमधून मिळतील. बामणोली जलपर्यटन केंद्र, कॅम्पेनिंग साईट, साहसी उपक्रम, नौकाविहार, रोपवे अशा ऍक्टिव्हिटीज असणार आहेत. यामध्ये होम स्टे, ऍग्रो टुरिझम योजना 20 गावांमध्ये राबविण्यात येणार आहे. 14 उद्योग समृद्धी केंद्रांचाही यामध्ये समावेश असेल. तसेच 44 ग्राम समूह विकसित करण्यात येणार असून पाच एकरावर न्युरोपॅथी सेंटर, शंभर एकरामध्ये आयुष मंत्रालयामार्फत बोटॅनिकल गार्डन देखील प्रस्तावित आहे.
हेही वाचा :