पुणे : राज्याचं राजकारणात मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे एकत्र येणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे. अशात शुक्रवारी उद्धव ठाकरे यांनी "महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होणार आहे" असं म्हटलंय. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत विचारलं असता ते म्हणाले "आम्ही महायुती म्हणून लढू आणि महायुती म्हणूनच जिंकणार."
पुणे शहर खड्डे मुक्त व्हावं : क्रेडाईच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांना याबाबत विचारलं असता त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. पावसाळा सुरू झाला असून पुणे शहरात अजूनही रस्त्यावर खड्डे पडलेले पाहायला मिळत आहेत. याबाबत एकनाथ शिंदे यांना विचारलं असता ते म्हणाले, "याबाबत मी महापालिका आयुक्तांना सूचना केल्या आहेत. पुण्यातील नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामा नये. पुणे शहर खड्डे मुक्त व्हावं यासाठी युद्धपातळीवर काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत."
आम्ही महायुती म्हणून लढणार आणि जिंकणार : "आम्ही महायुती म्हणून विधानसभा निवडणूक लढवली आणि मागच्या अडीच वर्षांत जे काम केलं त्याची पोच पावती म्हणून मोठं यश नागरिकांनी महायुतीला दिलं. आगामी निवडणूक देखील महायुती म्हणून लढणार आणि जिंकणार," असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगामी महापालिका निवडणुकीच्या संदर्भात बोलताना सांगितलं.
नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन : "क्रेडाईची कार्यकारी समारंभ आणि सर्वसाधारण सभा आहे. त्यांना मी शुभेच्छा देतो. मी आज माझी सगळी टीम घेऊन आलो आहे. कोणीतरी आता मला म्हणालं की लवकर निर्णय घेणारा मंत्री आहे. माझ्या कामाची पद्धत ही 'नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन' अशी आहे. मी, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आम्ही एकत्र टीम म्हणून काम करत आहोत. जी थांबलेली कामं होती त्यांना आम्ही चालना दिली आहे. मुंबई मेट्रो, कोस्टल रोड, कार शेड, अटल सेतू, पुणे मेट्रो यांना चालना देणारे काम यावर लागलेले सगळे स्टे मी काढून टाकले. आमचं प्रगतीचं सरकार आहे. काल समृद्धीच्या शेवटच्या टप्प्याचे काम आम्ही बघायला गेलो होतो. लोकांची समृद्धी व्हावी म्हणून आमचं हे समृद्धी सरकार आहे. मी मुख्यमंत्री असताना सगळे म्हणायचं सीएम मी म्हणायचो 'कॉमन मॅन' आता सरकारचा एकच अजेंडा आहे ते म्हणजे डेव्हलपमेंट! सरकारचा 150 दिवसांचा आराखडा तयार केला आहे. त्या दृष्टीनं आपल्याला पुढं जायचं आहे," असं एकनाथ शिंदे म्हणाले.
हेही वाचा :