ETV Bharat / state

दादरमध्ये मृत कबुतरांसाठी प्रार्थनासभा; महापालिका निवडणुकीत ताकद दाखवण्याचा जैन समाजाचा इशारा

जैन धर्माच्या अहिंसेच्या तत्त्वानुसार, कबुतरांना अन्न आणि आश्रय देणं हे पवित्र कर्तव्य मानलं जाते. मात्र कबुतरखाना बंद करण्यात आल्यानं जैन समाज आक्रमक झाला आहे.

Prayer Meeting for Peace of Souls Pigeons
दादरमध्ये मृत कबुतरांसाठी प्रार्थनासभा (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : October 11, 2025 at 12:47 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई: दादरमधील कबुतरखाना बंद केल्यामुळे शेकडो कबुतरांचा बळी गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. यानिमित्त महावीर मिशन ट्रस्टने या पक्ष्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी विशेष प्रार्थनासभेचं आयोजन केलं आहे. मुंबई पालिकेनं कबुतरखान्यांवर घातलेल्या बंदीविषयी तीव्र आक्षेप नोंदवत, आगामी पालिका निवडणुकीत आपली ताकद दाखवण्याचा इशारा जैन समाजानं या प्रार्थनासभेत दिला आहे. दादर येथील योगी सभागृहात आज ही प्रार्थनासभा सुरू राहणार आहे.

Prayer Meeting for Peace of Souls Pigeons
दादरमध्ये मृत कबुतरांसाठी प्रार्थनासभा (ETV Bharat)

'कबूतर बचाओ – जीव दया अपनाओ' : जैन धर्माच्या अहिंसेच्या तत्त्वानुसार, कबुतरांना अन्न आणि आश्रय देणं हे पवित्र कर्तव्य मानलं जाते. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आरोग्याच्या कारणास्तव पालिकेनं दादरमधील कबुतरखाना बंद केला आहे. यामुळे कबुतरं रस्त्यावर भटकत आहेत आणि अपघातांमुळे त्यांचा मृत्यू होत आहे.

"मृत कबुतरांचे दृश्य पाहून आमच्या मनाला वेदना होतात. दादरचा कबुतरखाना बंद केला, पण मुंबईतील इतर 50 कबुतरखाने का बंद केले जात नाहीत?" असा सवाल जैन धर्मगुरू निलेश मुनी महाराज यांनी सभेत उपस्थित केला. सकल जैन समाज मुंबई आणि राजस्थानी छत्तीस कोम मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सभेत सर्व आचार्य, साधू-साध्वी उपस्थित होते. 'कबुतर बचाओ – जीव दया अपनाओ' असा संदेश देत कबुतरखाने पुन्हा सुरू करण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

बिल्डर लॉबीचा दबाव? : दादर कबुतरखाना बंदीमागे बिल्डर लॉबी आणि राजकीय हितसंबंध असल्याचा गंभीर आरोप जैन समाजाकडून करण्यात आला आहे. कबुतरखान्यामुळे परिसरातील मालमत्तेचे भाव कमी होत असल्यानं ही जागा बिल्डरांना मिळवून देण्याचा डाव असल्याचा दावा माजी नगरसेवक पूरण दोशी यांनी केला.

"कबुतरांमुळे कुणाचा मृत्यू झाल्याचा पुरावा नाही. धुळीमुळेही मृत्यू होतात, म्हणून मुंबईतील सर्व बांधकामे बंद करणार का? कोंबड्यांमुळे बर्ड फ्लू होतो, म्हणून त्यांची विक्री थांबवणार का?" असे प्रश्न त्यांनी पालिकेच्या निर्णयावर टीका करत उपस्थित केले. दोशी म्हणाले, "हा निर्णय कोणत्या मंत्र्याच्या आणि बिल्डरच्या हितासाठी घेतला गेला, याचा शोध घेणं गरजेचं आहे."

नेमका वाद काय? : दादर कबुतरखान्याच्या परिसरातील रहिवाशांनी आरोग्याच्या तक्रारी नोंदवल्यानं मुंबई पालिकेनं कबुतरांना अन्न देण्यास मनाई केली. यामुळे 6 ऑगस्ट 2025 रोजी जैन समाजाने आक्रमक पवित्रा घेत ताडपत्री काढून टाकली, ज्यामुळे मुंबईत तणाव निर्माण झाला.

अखेर, 13 ऑगस्ट रोजी मुंबई उच्च न्यायालयानं तज्ज्ञ समिती स्थापन करण्याचे आदेश दिले. या समितीला कबुतरांच्या पिसे, विष्ठा आणि मानवी आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करून अहवाल सादर करण्याचं काम देण्यात आलं.

नगर विकास विभागाने 22 ऑगस्ट रोजी याबाबत शासन निर्णय जारी केला. सार्वजनिक आरोग्य सेवा, पुणे येथील संचालक विजय कांदेवाड यांच्या अध्यक्षतेखालील समितीत नगररचना विभागाचे संचालक जितेंद्र भोपळे, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे संचालक किशोर रिठे, तसेच एम्स नागपूरचे डॉ. प्रदीप देशमुख, पशुसंवर्धन विभागाचे डॉ. शिवाजी पवार, प्राणी कल्याण मंडळाचे एस. के. दत्ता, फुफ्फुस तज्ज्ञ सुजित रंजन, डॉ. अमिता आठवले, डॉ. मनीषा मडकईकर, प्रा. डॉ. आर. जे. झेंडे, डॉ. शिल्पा पाटील आणि पालिकेच्या दक्षा शहा यांचा समावेश आहे. दोन महिन्यांनंतरही समितीचा अहवाल प्रलंबित असून, अहवालानंतर न्यायालय पुढील निर्णय घेणार आहे.

हेही वाचा