जिल्हाधिकाऱ्यांच्या नावानं फेक फेसबुक अकाऊंट: भामट्यांनी कोतवाल महिलेला लुबाडलं
अमरावती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या नावानं बनावट फेसबुक अकाऊंट काढून महिलेची फसवणूक केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Published : June 24, 2025 at 1:06 PM IST
अमरावती : महसूल कर्मचारी असलेल्या महिलेस नागपूर इथल्या एका व्यक्तीनं अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचा मित्र असल्याचं सांगून 65 हजारानं गंडवलं. यासाठी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या बनावट फेसबुकचा वापर करण्यात आला. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनीच फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून मित्रास मदत करण्याचं भासवण्यात आलं. हा धक्कादायक प्रकार सोमवारी उघडकीस आला.
असा घडला संपूर्ण प्रकार : फसगत झालेली महिला चांदूर बाजार तालुक्यात महसूल विभागात कोतवाल म्हणून कार्यरत आहे. रविवारी सायंकाळी सदर महिलेस फेसबकुवरुन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांची फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. रिक्वेस्ट अॅक्सेप्ट करताच काही वेळातच हू आर यू असा संदेश मॅसेंजरवरून सदर महिलेस आला. यावेळी महिलेच्या मुलानं मोबाईल हाताळला, असं सांगून महिलेनं क्षमा मागितली. परंतु आपला मित्र नागपूर इथं असून तो सीआरएफमध्ये आहे. त्याला काही फर्नीचर विकायचं आहे. तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधा, असं मेसेज करणाऱ्या भामट्यानं सांगितलं. यानंतर काही वेळातच नागपूर इथून तथाकथित संतोषकुमार यानं फोन करून फर्नीचर विकायचं आहे, जिल्हाधिकारी यांनी संपर्क करण्यास सांगितल्याचं म्हटलं. महिलेनं होकार देवून 65 हजार रूपयात साहित्य घेण्याचं ठरलं. ठरल्याप्रमाणं महिलेनं सोमवारपर्यंत तब्बल 65 हजार रूपये पाठवले. यासाठी संबंधित महिलेनं वेगवेगळ्या नंबरवर फोन पे द्वारे पैसे पाठवले. सोमवारपर्यंत संपूर्ण रक्कम देवूनही फर्नीचर पाठवण्यात येत नसल्याचं महिलेच्या लक्षात आलं. फसगत झालेल्या कर्मचारी महिलेनं थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं. परंतु जिल्हाधिकाऱ्यांशी भेट होवू शकली नाही. यावेळी देखील सदर महिलेस फसवणूक करणाऱ्या आरोपीनं फोन करून फर्नीचर खरेदीसाठी आणखी 35 हजार पाठवण्यास सांगितले. परंतु आता पैसे मिळणार नाहीत. पाठवलेले परत करा, असं महिलेनं बजावलं. यावर पैसे परत होवू शकत नाहीत, असं सांगण्यात आलं. दरम्यान, महिलेनं याप्रकरणात ग्रामीण सायबर पोलिसात तक्रार दिली.
जिल्हाधिकाऱ्यांचं नागरिकांना आवाहन : "माझ्या नावानं बनावट फेसबुक अकाऊंट तयार करण्यात आलं आहे. त्यावरून अनेकांना विविध प्रकारच्या विनंत्या पाठवण्यात येत आहे. यास कोणीही प्रतिसाद देऊ नये. हा फसवणुकीचा प्रकार असून त्यास प्रतिसाद देऊ नये. अशा प्रकारची कोणतीही पोस्ट किंवा अकाऊंट तयार करण्यात आलं नसून नागरिकांनी बनावट अकाउंटवर कोणताही आर्थिक व्यवहार करू नये, किंवा संपर्क साधू नये. यात नागरिकांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे माझ्यासह जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावं फसवणुकीचे संदेश आल्यास स्वीकारू नये किंवा ब्लॉक करावं, असं आवाहनही जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केलं आहे.
हेही वाचा :

