छत्रपती संभाजीनगर : प्राचीन कथा असलेल्या श्री भद्रा मारुतीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी रात्रीपासूनच गर्दी करायला सुरुवात केलीय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथील लाखो भाविकांचं श्रध्दास्थान असलेल्या भद्रा मारूती मंदिरात आज पहाटे चार वाजता हनुमान जन्मोत्सव सोहळा (Hanuman Jayanti) पार पडला. हनुमान जन्मोत्वानिमित्त भद्रा मारूतीच्या मुर्तीचा शृगांर करण्यात आला. पहाटे अभिषेक आरतीसाठी जिल्ह्यातील मान्यवरांनी मोठी गर्दी केली होती.
श्रीभद्रा मारोती चे प्राचीन महत्त्व : खुलताबाद येथे थोर राजा भद्रसेन याचं वास्तव्य होतं, ते देखील प्रभू श्री रामाचे भक्त होते. एके दिवशी त्यांनी श्रीरामांच्या भक्तीत लीन होत स्तुती करताना, भक्तीगीत म्हणायला सुरुवात केली. त्याचवेळी श्री हनुमान अवकाशातून जात असताना त्यांच्या कानावर गीत पडले. ते लगेच त्याठिकाणी गेले आणि त्या मधुर गीतामध्ये मग्न झाले. काही वेळात त्यांनी योग मुद्रा धारण केली, त्याला त्याकाळी भाव समाधी असं देखील म्हटलं जातं. भक्तीगीत संपल्यावर राजा भद्रसेन याने पहिले तर त्यांना आश्चर्य वाटले की, साक्षात श्री हनुमान निद्रावस्थेत होते. त्यांनी भक्तांना आशीर्वाद द्यावा अशी मनोकामना केली आणि त्याच ठिकाणी निद्रावस्थेतील मूर्ती प्रगटली. त्यावेळीपासून त्या मारुतीला 'भद्रा मारुती' असं नाव पडलं.
देशात तीन ठिकाणी निद्रावस्थेत श्री हनुमानाचं दर्शन : खुलताबाद येथील श्री भद्रा मारुती देशातील प्रसिद्ध असे स्थान मानले जाते. कारण श्री हनुमानाची निद्रा अवस्थेत असलेली आगळे वेगळी मूर्ती या ठिकाणी आशीर्वाद देते. देशात तीन ठिकाणी अशा पद्धतीची मूर्ती पाहायला मिळते. प्रयागराज येथे एक, तर मध्य प्रदेशातील जाम सावली येते आणि खुलताबाद येथे भद्रा मारुती अशा या तीन ठिकाणी अशा पद्धतीची निद्रावस्थेत श्री हनुमान विराजमान आहेत. दरवर्षी लाखोंच्या संख्येने भविक दर्शनासाठी येतात.
रात्रीपासून भक्तांची दर्शन रांग : शुक्रवार रात्रीपासूनच भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. यात प्रामुख्याने छत्रपती संभाजीनगर येथून पायी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी होती. "भद्रा हनुमान कि जय" म्हणत भाविक दर्शन घेत होते, तर हनुमान भक्तांनी खुलताबादनगरी दुमदुमली आहे. श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त भाविकांसाठी भद्रा मारुती मंदिर २८ तास सुरू ठेवण्यात आलं आहे.
हेही वाचा -