मुंबई : मुंबई आणि परिसरातील जुन्या गृहनिर्माण सोसायटी समोरील पुनर्विकासाच्या महत्त्वपूर्ण समस्येवर मार्ग काढण्यासाठी त्यांना आवश्यक मदत, सहाय्य देण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी आणि त्यांच्या शंका दूर करुन योग्य मार्ग दाखवण्यासाठी क्रेडाई-एमसीएचआयनं पुढाकार घेतला आहे. पुनर्विकास कसे होते, त्याचे कोणते प्रकार आहेत, सरकारच्या विविध धोरणांबाबत माहिती अशा विविध बाबींवर यावेळी मार्गदर्शन केलं जाणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
- क्रेडाई-एमसीएचआय पुनर्विकास सुलभता प्रदर्शनाच्या दुसऱ्या आवृत्तीमध्ये 30पेक्षा जास्त विकासक एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत. सोसायट्यांना पुनर्विकास करताना येणारी आव्हाने, इतर माहिती एकाच व्यासपाठीवर उपलब्ध करुन दिली जाणार आहे.
पाच हजार सोसायट्या सहभागी होणार : शनिवारी होणाऱ्या या प्रदर्शनासाठी आतापर्यंत 3100 सोसायट्यांनी नोंदणी केली आहे. या कार्यक्रमात सुमारे 5 हजार सोसायट्या सहभागी होण्याची अपेक्षा आहे. गेल्या कार्यक्रमात 2 हजारपेक्षा अधिक सोसायटी सहभागी झाल्या होत्या. याबाबत क्रेडाई- एमसीएचआयचे अध्यक्ष डोमनिक रॉमेल म्हणाले, "पुनर्विकासाबाबत आवश्यक असलेली सर्व माहिती आम्ही या माध्यमातून एकाच व्यासपीठावर उपलब्ध करुन देत आहे. त्यामुळं सोसायट्यांना मोठा लाभ होईल. पुनर्विकासाबाबत स्पष्टता आणि पारदर्शकता आणून हजारो गृहनिर्माण संस्थांच्या गरजा पूर्ण करणाऱ्या या महत्त्वपूर्ण उपक्रमाचं नेतृत्व आम्ही करत आहोत, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
रेडीरेकनर दरात राज्य शासनानं पाच वर्षांनंतर केवळ पाच टक्के वाढ केली आहे. ही फार चांगली आणि कौतुकास्पद बाब आहे. पुनर्विकासात त्याचा फारसा फरक पडणार नाही. जीएसटी इनपुट क्रेडिटमध्ये बिल्डरला मिळत नाही. त्यामुळं यामध्ये जीएसटीला अॅड करण्याची मागणी आम्ही सरकारला केली आहे. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियानं रेपो दरात कपात केली असली तरी त्याचा लाभ बँकांनी ग्राहकांना देणं गरजेचं आहे, तरच त्याचा परिणाम होऊ शकेल. अमेरिकेनं चीनवर 104 टक्के तर भारतावर 26 टक्के आयातशुल्क लावलं आहे, याचा देशाला चांगला लाभ होईल," असा दावा त्यांनी केला. "या प्रदर्शनात महापालिका, म्हाडा, एमएमआरडीए यासारखे प्रमुख भागधारक सहभागी होतील. पुनर्विकासाबाबत विचार सुरू असणाऱ्या सोसायट्यांना एकाच छताखाली आघाडीच्या विकासक, वास्तुविशारद, नियोजक, वित्तीय संस्था, कायदेतज्ञांशी थेट संपर्क साधण्याची संधी मिळेल," असं डोमनिक रोमेल म्हणाले.
- मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही तत्पर : "पुनर्विकास सुलभ करणं, गोंधळ दूर करणं, सोसायटी सदस्यांना आवश्यक ज्ञान पुरवणं यावर या प्रदर्शनात आमचा भर राहील, असे स्पष्ट केलं. विकासकाची निवड करण्यापासून प्रकल्प पूर्ण होईपर्यंत मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही तत्पर आहे," असं क्रेडाई-एमसीएचआयचे सचिव धवल अजमेरा यांनी स्प्ष्ट केलं.
हेही वाचा :