मुंबई- मित्रासोबत स्वेच्छेने घरातून पळून गेलेल्या आणि त्यानंतर मित्राविरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदवलेल्या प्रकरणात आरोपी तरुणाला सुमारे चार वर्षांच्या तुरुंगवासानंतर मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केलाय. खरं तर हे प्रकरण घडले तेव्हा या प्रकरणातील तक्रारदार मुलगी 15 वर्षांची तर मुलगा 21 वर्षांचा होता. मुलीच्या घरच्यांना तरुणासोबत असलेल्या संबंधाबाबत माहिती होती, तिचे आरोपी तरुणासोबत प्रेमसंबंध होते. स्वेच्छेने ती मुलगी घर सोडून गेली, तेव्हा तिच्यावर कुणाचाही दबाव नव्हता, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. आरोपीतर्फे ॲड मतीन कुरैशी यांनी बाजू मांडली. 25 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर आरोपीला जामीन देण्यात आला. तक्रारदारातर्फे ॲड आफ्रिन शेख, ॲड शेहजाद शेख तर राज्यातर्फे ॲड राजश्री न्युटन यांनी काम पाहिले.
25 जुलै 2020 रोजी घरातून पळून गेली : तक्रारदार मुलगी अल्पवयीन असली तरी तिला ती जे कृत्य करत आहे, त्याचे पुरेसे ज्ञान होते, मात्र तरीही ती स्वेच्छेने मुलासोबत जाण्यासाठी घरातील कुणालाही न कळवता घरातून पळून गेली, असे निकालपत्रात नोंदवण्यात आले आहे. तक्रारदार तिच्या घरातून 25 जुलै 2020 रोजी घरातून पळून गेली होती. या प्रकरणी 4 ऑगस्ट 2020 रोजी अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला. त्यानंतर तब्बल 10 महिन्यांनंतर 8 मे 2021 रोजी तरुणीने तिच्या वडिलांना दूरध्वनी करून ती गरोदर असल्याची माहिती दिली आणि मुलगा लग्न करत नसल्याचे सांगितलंय.
घरच्यांना काहीही माहिती न देता ती मुलासोबत दिल्लीला गेली : आरोपीचे वकील ॲड मतीन कुरैशी यांनी युक्तिवाद करताना आरोपी आणि तक्रारदार दोघे एकमेकांना ही घटना घडण्याच्या पूर्वीपासून 2019 पासून ओळखत होते, याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. तक्रारदाराच्या जबाबात तिने तिचे मुलासोबत 2019 पासून प्रेम संबंध होते, तिने कोणत्याही दबावाविना स्वेच्छेने स्वतःचे घर सोडून, घरच्यांना काहीही माहिती न देता ती मुलासोबत दिल्लीला गेली आणि तिथून उत्तर प्रदेशमधील त्याच्या घरी राहण्यास गेली. तिथे ती मुलासोबत तब्बल 10 महिने स्वेच्छेने राहिली, त्यामुळे जे काही घडत आहे, त्या सर्व बाबींची तिला जाणीव होती, असा युक्तिवाद ॲड कुरैशी यांनी केला. आरोपीला जामीन देताना त्याने न्यायालयाच्या परवानगीशिवाय राज्याबाहेर जाऊ नये, अशी अट लादली आहे.
हेही वाचा :