नागपूर- आदिवासी समाजात धर्मांतराचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढत आहे. खरं तर धर्मांतराकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं आवाहन काँग्रेसचे माजी केंद्रीय राज्यमंत्री अरविंद नेताम यांनी केलंय. ते काल नागपूरात आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्ता विकास- वर्गाच्या समारोपीय कार्यक्रमात बोलत होते. अरविंद नेताम संघाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. छत्तीसगड राज्यात आताची सर्वात मोठी समस्या धर्मांतराची आहे. कोणत्याही सरकारने याकडे कधीही गांभीर्याने लक्ष दिलं नाही. एकमेकांवर दोषारोप करण्यापलीकडे राजकीय नेते, पक्ष काहीच करीत नसल्याचा आरोप अरविंद नेताम
यांनी केलाय.
संघाला आपली गती वाढवण्याची गरज - मात्र, ही समस्या समूळ नष्ट करण्याची क्षमता ही केवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आहे. संघाला आपली गती वाढवण्याची गरज असल्याचे ते म्हणालेत. छत्तीसगडच्या बस्तरमध्ये नक्षलवादासोबतचं धर्मांतर मोठी समस्या आहे. दोन समस्या आहेत, त्यामुळे संघ आणि आदिवासी समाजाने या समस्येवर उपाय शोधला पाहिजे, असंही त्यांनी अधोरेखित केले. संघाच्या कार्याबद्दल लोकांमध्ये आस्था निर्माण झालेली आहे. धर्मांतराबद्दल चर्चा होण्यासही सुरुवात झालीय.
धर्मांतरानंतर घर वापसीचा स्वीकार करा - काँग्रेसचे माजी केंद्रीय राज्यमंत्री अरविंद नेताम यांनी उपस्थित केलेल्या धर्मांतराच्या मुद्द्यावर सरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणाले की, आदिवासी भागांमध्ये धर्मांतराचा मुद्दा हा अतिशय गंभीर आहे. विविध प्रलोभने, आमिष दाखवून आदिवासींचे धर्मांतर केले जात असेल तर हे अत्यंत चुकीचे आहे. धर्मांतर एका प्रकारे हिंसाचं असल्याचे देखील सरसंघचालक मोहन भागवत म्हणालेत. मात्र, ज्यांना घर वापसी करायची असेल त्यांचा स्वीकार देखील समाजाने केला पाहिजे, असं देखील ते म्हणाले आहेत.
युद्धाची परिभाषा बदलली - यावेळी बोलताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी पाकिस्तानवर बोचरी टीका केलीय. पहलगाम येथे दहशतवादी हल्लानंतर देशभरात मोठा आक्रोश होता. भारतीय सैन्याने आपली क्षमता पुन्हा सिद्ध केली आहे. ज्यावेळी देशाचा प्रश्न येतो, त्यावेळी इतर सर्व विषय गौण असेल पाहिजेत, असे देखील म्हणालेत. आता युद्धाची परिभाषा बदलली आहे. एका क्लिकवर ड्रोन हल्ला नियंत्रण केला जाऊ शकतो. शिवाय सायबर वॉर, प्रोक्सीवॉरदेखील सुरूच आहेत. या सर्वांबरोबर लढायचे असेल तर सुरक्षेच्या बाबतीत देशाने आत्मनिर्भर होणे गरजेचे असल्याचं मतही सरसंघचालक मोहन भागवत यांनी अधोरेखित केलंय.
हेही वाचाः
बायकोचा 'गेम' करुन नवरा मुलासह फरार ; पोलिसांकडून नवऱ्याचा शोध सुरू
सात महिन्याच्या गर्भवती महिलेच्या तक्रारीनंतर पती विरोधात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?