बारामती (पुणे)- बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काल पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बनेश्वर रस्त्यासाठी आंदोलन केलं होतं. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली होती. सुप्रिया सुळे यांना पाच कोटींचा खासदार निधी मिळतो. खासदार निधीतून एका मिनिटात रस्त्याला मंजुरी देता येते, असं म्हणत अजित पवार यांनी सुप्रिया सुळेंना टोला लगावला होता. यानंतर आज सुप्रिया सुळे यांनी बारामतीमध्ये माध्यमांशी बोलताना अजित पवार यांच्या या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलंय. पाच कोटींचा फंड एवढ्या मोठ्या मतदारसंघात विकासकामाला पुरतच नसल्याचं त्यांनी म्हटलंय. खासदार फंड वाढवून देण्याची मागणी आम्ही पंतप्रधानांकडे केल्याचेदेखील त्यांना म्हटलंय.
एका खासदाराच्या मतदारसंघांमध्ये 23 लाख मतदार : याबाबत बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, देशातल्या सर्वच खासदारांची ही मागणी असून, आम्ही सर्वांनी पंतप्रधानांकडे ती केलीय. आमच्या मतदारसंघांमध्ये म्हणजे एका खासदाराच्या मतदारसंघांमध्ये 23 लाख मतदार आहेत. यामध्ये नऊ तालुक्यांचा समावेश होतो. हे पैसे शाळांना दिले, रस्त्यांना दिले तर हे पैसे कशालाही पुरत नाहीत. हे पैसे अपुरे पडतात. आम्ही पंतप्रधानांना विनंती केली आहे की, आमच्या मतदारसंघातील लोकसंख्या प्रचंड वाढायला लागलेली आहे. त्याच्यामुळे आमचा खासदार फंड वाढवा. खासदाराला पाच कोटी रुपये फंड दिला जातो. मात्र आता एक नगरसेवकसुद्धा पाच कोटी रुपयांचा पुल बांधतो, असंही सुळे म्हणाल्यात.
पाच कोटींचा एवढासा निधी पुरत नाही : लोणावळ्यातील आंबे गावापासून ते इंदापूरच्या शेवटच्या गावापर्यंत तर साताऱ्यापासून नगरपर्यंत हा मतदारसंघ विस्तारलेला आहे. एवढ्या मोठ्या मतदारसंघांमध्ये विकासकामांसाठी पाच कोटींचा एवढासा निधी अजिबातही पुरत नाही. बनेश्वरचा रस्ता हा जिल्हा परिषदेचा आहे. कोणत्याच खासदाराकडे अशा रस्त्यांच्या कामासाठी आता निधी शिल्लक राहत नाही. त्यामुळे हा रस्ता जिल्हा परिषदेने करावा ही अपेक्षा आहे. रस्त्याच्या कामामध्ये गडकरी साहेबांचं चांगलं सहकार्य असतं, जलजीवनच्या कामामध्ये देखील डी. आर. पाटलांचं सहकार्य आहे, असं म्हणत खा. सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय मंत्र्यांचे कौतुक केलंय.
जय पवारांच्या साखरपुड्याचे मला आमंत्रण : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांचा आज साखरपुडा आहे. या साखरपुड्याला तुम्ही हजेरी लावणार का? असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आला होता. यावेळी त्यांनी हजेरी नाही तर मला सुमित्रा वहिनींचा फोन आला होता. मला आमंत्रण आहे. त्यामुळे मी या सोहळ्याला जाणार आहे. त्याचबरोबर सदानंद सुळे, रेवती सुळे हेदेखील या सोहळ्याला जाणार असल्याचे त्यांनी म्हटलंय. मात्र इतर कोण जाणार आहे किंवा नाही याबाबत आपल्याला माहिती नाही, असंदेखील खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितलंय.
हेही वाचाः
तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाला अमेरिकन न्यायालयाची परवानगी; आता राणाला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा