छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर स्थानिक पातळीवर युती आघाडी करण्याचे प्रयत्न होत असल्याचं पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये जाण्यास नकार देणाऱ्या 'वंचित'ला काँग्रेसतर्फे प्रस्ताव पाठवण्याची तयारी होत आहे. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी समविचारी पक्ष सोबत असले पाहिजे, त्यासाठी बोलणी सुरू असल्याची माहिती काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष युसुफ शेख यांनी दिली. त्यावर "समोर कोणीही आलं तरी आम्हाला फरक पडत नाही. आमचं काम बोलते," असं उत्तर भाजपा जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी दिलं आहे. तर "वंचित यांच्यासोबत जाणार नाही," असं मत मंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केलं.
काँग्रेस तर्फे बोलणी सुरू : "महानगर पालिका निवडणूक पुढील काही महिन्यात होईल, अशी शक्यता आहे. त्यामुळे आपले नगरसेवक जिंकून आणण्यासाठी राजकीय पक्ष वेगवगेळे प्रस्ताव तयार करत आहेत. असाच एक प्रस्ताव काँग्रेस पक्षातर्फे तयार करण्यात येत असून त्याची प्राथमिक बोलणी सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपानं जसं यश मिळवलं, तसं यश महानगर पालिका निवडणुकीत मिळू नये यासाठी समविचारी पक्षांना सोबत घेण्याचा विचार आहे," असं शहर जिल्हाध्यक्ष युसुफ शेख यांनी सांगितलं. "वंचित पक्षातील काही लोकांशी प्रस्ताव देण्याबाबत प्राथमिक बोलणी केली आहे. ठाकरे गट, शरद पवार यांची राष्ट्रवादी यांच्या सोबत वंचित सोबत आल्यास फायदा होईल. त्याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांना याबाबत बोलणार आहे, भाजपाला अडवण्यासाठी प्रयत्न करू," असं देखील शेख युसुफ यांनी सांगितलं.
आघाडीसाठी वरिष्ठांशी बोलणार : महानगर पालिका निवडणूक महत्वाची आहे, त्या अनुषंगानं अद्याप कोणते प्रस्ताव आमच्याकडं आले नसल्याचं स्पष्टीकरण वंचित पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित भुईगळ यांनी दिलं. "निवडणुकीत समविचारी पक्षासोबत गेल्यास फायदा होईल, त्यामुळे कोणाचे प्रस्ताव आले तर त्यावर नक्की विचार करू. आमच्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांना माहिती देऊन त्यावर ते अंतिम निर्णय घेतील आणि तो निर्णय आम्ही मान्य करून काम करू," असं भुईगळ यांनी सांगितलं.
विरोधकांनी केली टीका : "काँग्रेस तर्फे सुरू झालेल्या चर्चेबाबत विरोधकांनी टीका केली आहे. वंचित आता यांच्यासोबत जाईल असं, वाटत नाही. एकवेळा उबाठा गट एम आय एम सोबत जाऊ शकतो, मात्र हे काँग्रेस सोबत जाणार नाही," अशी टीका समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांनी केली. तर महानगर पालिका निवडणुकीत आमच्या समोर कोणीही आले तरी आम्हाला फरक पडणार नाही, असं भाजपा जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी सांगितलं. "भाजपानं मागील काही वर्षात अनेक कामं केली. महाविकास आघाडीनं त्यांच्या अडीच वर्षात कामं केली त्याची त्यांनी माहिती द्यावी, मात्र ते देऊ शकणार नाहीत. आमचे कार्यकर्ते केलेल्या कामांच्या जोरावर उत्साही आहेत. त्यामुळे पालिकेवर आमचाच झेंडा फडकणार आहे," असं किशोर शितोळे यांनी सांगितलं. त्यामुळे काँग्रेस तर्फे सुरू करण्यात आलेल्या चर्चा प्रत्यक्षात उतरणार का? याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.
हेही वाचा :