ठाणे : महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारकडून विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. महिलांच्या सुरक्षेसाठी दामिनी पथकासह इतर अनेक पथकांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत, तरी देखील 'पावला पावलावर असते भय अन् सरकार म्हणे संरक्षणाची केली सोय' असं म्हणायची वेळ आता भिवंडी शहरातील महिलांवर आली आहे. भिवंडी शहरात अल्पवयीनांच्या अपहरणाच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच मागील चार दिवसांत पाच मुली आणि एका मुलाच्या अपहरणाच्या घटना समोर आल्या आहेत, यामुळं पालकांमध्ये भीती आणि चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.
विविध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी १२ एप्रिलला संध्याकाळी ७:३० वाजता शांतीनगर वंजारपट्टी नाका परिसरातील १७ वर्षीय मुलगी आईस्क्रीम घेण्यासाठी खाली गेली, पण रात्री उशिरापर्यंत ती परतली नाही. नातेवाईकांनी शोध घेऊनही ती न सापडल्यानं तिच्या आईनं शांतीनगर पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली आहे.
चार दिवसात सहा अपहरण : दुसऱ्या घटनेत रविवारी रात्री ९ वाजता कोनगाव पोलीस ठाणे परिसरातील १५ वर्षीय मुलीचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केले. याप्रकरणी पीडितेच्या आईने कोनगाव पोलिसात तक्रार दाखल केली आहे, तर १३ एप्रिल रोजी शांतीनगरमधील रहमतपूर भागातील १६ वर्षीय मुलगा बेपत्ता झाल्याची बातमीही समोर आली. या अपहरण प्रकरणी त्याच्या आईने शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
"कोनगाव पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या अपहरण प्रकरणांची सखोल चौकशी सुरू आहे. लवकरच आरोपींना अटक केली जाईल व मुलाची सुखरुप सुटका केली जाईल." - नेताराम म्हस्के - वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोनगाव पोलीस ठाणे
पालकांमध्ये भीतीचे वातावरण : बरफ गल्ली काप कणेरी येथील रहिवासी १५ वर्षीय मुलगी १४ एप्रिल रोजी मंगळवारी सकाळी पाऊणे सात वाजता कोणालाही न सांगता घराबाहेर पडली आणि परतलीच नाही. तिच्या कुटुंबियांनी नातेवाईकांमध्ये शोध घेतला पण काहीच पत्ता लागला नाही. याप्रकरणी शहर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. त्याचप्रमाणे १५ एप्रिल रोजी सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास गुलझार नगर परिसरातील १३ वर्षीय मुलगी कोणाला काहीही न सांगता घराबाहेर गेली असता कोणीतरी अज्ञाताने आमिष दाखवून अपहरण केल्याची तक्रार तिच्या आईने शांतीनगर पोलीस ठाण्यात केली आहे. तसेच भोईवाडा हद्दीतील १६ वर्षीय मुलगी ही १४ एप्रिल रोजी संध्याकाळी साडे सहा वाजता दुकानात चिप्स आणायला जात असल्याचे सांगून गेली. त्यानंतर बराच उशीर होऊनही ती घरी न परतल्यानं तिच्या मामानं अज्ञाताच्या विरोधात भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागरिकांनी केली मागणी : या सततच्या अपहरणाच्या घटनांमुळं पोलीस प्रशासनासमोर अशा घटना रोखण्याचं मोठं आव्हान निर्माण झालं असून, पालकांमधून मुलांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त होत आहे. यासह बेपत्ता मुलांना लवकरात लवकर शोधून त्यांना सुखरूप परत आणावे आणि अशा घटनांवर कडक नियंत्रण आणावे, अशी मागणी नागरिकांनी पोलीस प्रशासनाकडं केली आहे.