ETV Bharat / state

कोल्हापूरात पूरस्थिती नियंत्रणात, नागरिकांनी घाबरू नये; पूर परिस्थितीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आवाहन

अतिवृष्टीमुळं पंचगंगा नदीसह विविध नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. तर आता पूरस्थिती नियंत्रणात असून नागरिकांनी घाबरू नये, अशी माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली.

Kolhapur Flood Update
जिल्हाधिकारी अमोल येडगे आढावा घेताना (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : August 21, 2025 at 8:28 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळं अख्ख्या कोल्हापूर जिल्ह्याची चिंता वाढली होती. मात्र, गुरुवारी आभाळ काहीसं खुलं झाल्यानं आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचं प्रमाण कमी झाल्यानं पुरस्थितीत हळूहळू सुधारणा दिसून येत आहे. गुरुवारी दिवसभर पावसानं जवळपास उघडीप दिल्यामुळं नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण पाहायला मिळालं. मात्र, पंचगंगा नदीची पाणी पातळी ही धोका पातळीवर पोहोचल्यामुळं अद्यापही सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. कोयना, वारणा, राधानगरी व दूधगंगा धरणांतून सोडला जाणारा विसर्ग कमी झाला असून पुढील दोन दिवसांत परिस्थिती सामान्य होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

अनावश्यक गर्दी टाळा : "अलमट्टी धरणाच्या विसर्गाबाबतही कर्नाटक प्रशासनाशी समन्वय सुरू असून त्याचा थेट परिणाम जिल्ह्यातील नदीच्या पाणी स्थितीवर होईल. पंचगंगा नदीची पाणी पातळी राजाराम बंधाऱ्याजवळ स्थिरावली आहे. तर, पुराच्या पाण्यातून वाहन चालविण्याचा धोका घेऊ नका, तसेच पूरपरिस्थिती पाहायला होणारी अनावश्यक गर्दी टाळा." असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी नागरिकांना केलंय

माहिती देताना जिल्हाधिकारी अमोल येडगे (ETV Bharat Reporter)

परिसराची केली पाहणी : गुरुवारी जिल्हाधिकारी येडगे यांनी शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड, नृसिंहवाडी तसेच हातकणंगले तालुक्यातील इचलकरंजी परिसराची पाहणी केली. नृसिंहवाडी दत्त मंदिराजवळील वाढलेली पाणीपातळी आणि कुरुंदवाडमधील पूरग्रस्त भागामधील पूर परिस्थितीची माहिती घेतली. कुरुंदवाड येथील श्री दत्त महाविद्यालयात उभारलेल्या निवारा केंद्रात स्थलांतरित नागरिकांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या अडचणी देखील जाणून घेतल्या. यावेळी नागरिकांना धीर देत त्यांनी जिल्हा प्रशासन सोबत असून आवश्यक त्या सुविधा पुरवल्या जातील, असं आश्वासन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिलं. या पाहणीदरम्यान इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील, उपविभागीय अधिकारी दीपक शिंदे, तहसिलदार अनिलकुमार हेळकर, अपर तहसिलदार महेश खिलारी, गटविकास अधिकारी नारायण घोलप व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पांडुरंग खटावकर उपस्थित होते.



68 बंधारे पाण्याखाली : दरम्यान गुरुवारी सायंकाळी 6:00 वाजण्याच्या सुमारास राजाराम बंधारा या ठिकाणी पंचगंगेची पाणी पातळी 43 फूट 03 इतकी नोंदवण्यात आली आहे. सध्या 62,937 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग पंचगंगा नदीमध्ये होत आहे. तर जिल्ह्यातील लहान मोठे एकूण 68 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर इचलकरंजी बंधारा या ठिकाणी पंचगंगा नदीची पाणी पातळी 66 फूट 04 इंच नोंदवण्यात आली आहे. त्यामुळं अजून पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीवरुन वाहत असल्यानं जिल्हा प्रशासन सर्व संभाव्य पूर परिस्थितीसाठी सज्ज आहे.

हेही वाचा -

  1. कोल्हापुरात पूरस्थिती; पंचगंगा नदीच्या पुरात मंदिरासह शेती गेली पाण्याखाली, पाहा ड्रोन व्हिडिओ
  2. कोल्हापुरात पंचगंगा नदीचे पाणी यंदा पहिल्यांदाच पात्राबाहेर, जिल्ह्यातील 24 बंधारे पाण्याखाली, प्रशासन अलर्ट मोडवर
  3. पंचगंगा नदी इशारा पातळी गाठायला 'इतके' फूट बाकी; तब्बल 38 बंधारे पाण्याखाली - Panchganga River