नागपूर : भारताची आर्थिक राजधानी मुंबईवर 26/11 चा हल्ला झाला, तेव्हाच दहशतवाद आणि त्यांना पोसणारे आका अर्थात तेथील सरकार यांना वेगळे मानू नका, अशी मागणी आपण जगापुढे केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात भारताने ती आपली अधिकृत भूमिका म्हणून जाहीर केली, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केल्यानंतर नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पंतप्रधानांनी सांगितलेले तीन ‘न्यू नॉर्मल’ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन ‘न्यू नॉर्मल’ सांगितले. कुठलीही दहशतवादी कारवाई हा भारतावरचा हल्ला मानण्यात येईल व त्याला तितकेच ठोस असे उत्तर दिले जाईल. कोणतेही ‘न्यूक्लिअर ब्लॅकमेलिंग’ आम्ही कदापिही सहन करणार नाही तसेच दहशतवादी आणि त्यांना पोसणारे आका म्हणजे पाकिस्तानचे सरकार यांना वेगळे पाहणार नाही. या तिन्ही बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कारण, दरवेळी दहशतवादी हल्ला झाला की, पाकिस्तानचे सरकार आमचा दहशतवादाशी काही संबंध नाही, असा जगासमोर कांगावा करीत होते. पण, आता तसे होणार नाही. भारताने आपली भूमिका अत्यंत स्पष्टपणे जगापुढे मांडली आहे."
भारतीय सैन्याला, पंतप्रधानांना धन्यवाद- फडणवीस : "भारताने पंजाब प्रांतांत जाऊनही कशाप्रकारे ऑपरेशन केले, हे देखील पंतप्रधानांनी सांगितले. पाकिस्तानने घाबरुन भारताला फोन केला आणि शस्त्रसंधी मागितली, हेही त्यांनी सांगितले. भारताने 'ऑपरेशन सिंदूर' हे किती ताकदीने, शक्तीने, संयमाने आणि अचूकतेने राबविले, हे त्यातून दिसून येते. मी भारतीय सैन्य दलाचे अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि मोदींनाही धन्यवाद देतो. आता केवळ पाकव्याप्त काश्मीरवरच चर्चा होईल, हेही पंतप्रधानांनी आपल्या संबोधनातून स्पष्ट केले आहे," असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
हेही वाचा -