पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली. महायुतीच्या जागावाटपाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक विधान केलं होतं. महायुतीत जागावाटपावरुन मतभेद होण्याची शक्यात आहे, असं पवार म्हणाले होते. त्यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना टोला मारला. "जर अडचण आली तर पवार साहेबांचा सल्ला घेऊ," असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना टोला लावला आहे. मुख्यमंत्री पुण्यात बोलत होते.
शेतकरी राजाला मदत दिली जाणार : पावसामुळं शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालं आहे त्याची नुकसान भरपाई अजूनही मिळालेली नाही. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "ज्या ठिकाणचे नुकसान झाले आहे, त्याचे प्रस्ताव सरकारकडे येत आहेत. जसेजसे प्रस्ताव येत आहेत, तसंतसं आपण मदत करत आहोत. ही ऑनगोइंग प्रक्रिया असून, कधीच थांबत नाही." त्यामुळं लवकरात लवकर मदत दिली जाण्याचं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.
पतंगबाजी चालू राहील : संजय राऊत यांच्याबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, "ते काय बोलतात हे मला कशाला विचारतात. माझ्या लेव्हलचं कोणी माणूस असेल, ज्याला राजकारण समजतं, ज्याला खरं बोलता येतं अशा व्यक्तींबाबत मला प्रश्न विचारा." ठाकरे बंधू तसेच दोन्ही पवार एकत्र येण्याबाबत फडणवीस यांना विचारलं असता ते म्हणाले, "ते दोन पक्ष आणि दोन भाऊ आहेत. काक- पुतणे आहेत. त्यांनी त्यांचं ठरवावं आणि जर ठरवलं तर प्रतिक्रिया देऊ, नाहीतर तुमची पतंगबाजी चालू राहील."
लेखाला लेखानं उत्तर देऊ : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत हेराफेरी झाल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एका लेखाच्या माध्यमातून केला होता. त्यावरुनही देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांना प्रत्युत्तर दिलं आहे. "लेखाला उत्तर लेखाने दिलं जाईल," असं यावेळी फडणवीस म्हणाले.
हेही वाचा -