छत्रपती संभाजीनगर - अनिल अंबानी यांच्या नेतृत्वातील रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर (Devendra Fadnavis news) कंपनी बॅटरी उत्पादनासह इलेक्ट्रिक वाहनांच्या प्रकल्पाची छत्रपती संभाजीनगरमध्ये उभारणी करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात आज घोषणा केली. ५०० एकर जागेवर १४,३७७ कोटींची गुंतवणूक ऑरिक बिडकीन येथे केली जाणार आहे. या प्रकल्पामधून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. नुकतेच दावोस येथे या संदर्भात सामंजस्य करार झाला होता. त्यामुळे विभागातील उद्योगाला चालना देणारा हा प्रकल्प असेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
रिलायन्स करणार मोठी गुंतवणूक- अनिल अंबानी यांच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीनं छत्रपती संभाजीनगर येथे इलेक्ट्रिक वाहन (EV) आणि बॅटरी उत्पादन प्रकल्प उभारणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात घोषणा केली. नुकतेच दावोस येथे या संदर्भात सामंजस्य करार झाला होता. बिडकीन येथील ऑरिक औद्योगिक वसाहतीत येथील सुमारे ५०० एकर जागेवरील प्रकल्पासाठी रिलायन्स कंपनी गुंतवणूक करणार आहे. याद्वारे ४ हजारांहून अधिक युवकांना थेट रोजगारांच्या संधी निर्माण होतील. कंपनीचे दरवर्षी २,५०,००० इलेक्ट्रिक वाहने उत्पादन करण्याचं उद्दिष्ट आहे.
आतापर्यंत मोठ्या गुंतवणुकीची घोषणा बिडकीन येथे आतापर्यंत अनेक गुंतवणुकीचे प्रकल्प उभारणीबाबत घोषणा झाली आहे. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर व्यतिरिक्त, ऑरिक येथे जेनसॉल (Gensol) कंपनीनं ४ हजार कोटींची गुंतवणूक घोषणा केली. त्यातून ३ हजार लोकांना रोजगार उपलब्ध होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अवनी पॉवर १०,५२१ कोटींची गुंतवणूक करून बॅटरी उत्पादन प्रकल्प सुरू करणार आहे. यामधून जवळपास ५ हजार लोकांना रोजगार उपलब्ध होईल, असा अंदाज आहे. तर टोयाटो आणि जेसडब्ल्यू यासारख्या आघाडीच्या कंपन्यांच्या गुंतवणुकीनंतर छत्रपती संभाजीनगर हे देशातील महत्वाचे ईव्ही उत्पादन केंद्र म्हणून उदयाला येईल. त्याचबरोबर गुंतवणुकीमुळे शहराच्या औद्योगिक वाढीला नवी दिशा मिळेल. स्थानिक नागरिकांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असा विश्वास उद्योगक्षेत्रातून व्यक्त केला जात आहे.
दावोसमध्ये १५ लाख ७० हजार कोटींचे करार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यंदा दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) गेल्यानंतर विक्रमी गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले. हे करार तब्बल १५ लाख ७० हजार कोटी रुपयांचे आहेत. त्यातील ९८ टक्के गुंतवणूक ही विदेशी असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. महाराष्ट्रातील गुंतवणुकीतून १५ लाख ९५ हजार रोजगारनिर्मिती होईल, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला होता.
हेही वाचा-