ETV Bharat / state

ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एन्ट्री; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे. परंतु आज गुरूवारी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील बैठकीमुळं राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण आलय.

RAJ THACKERAY CM FADNAVIS
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : June 12, 2025 at 2:03 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : देशभरात सध्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे बंधू एकत्र येणार की नाही याच्या चर्चा सुरू आहेत. याबाबत दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून तसे संकेत दिले जात आहेत. परंतु, राज्याच्या राजकारणातून मोठी माहिती समोर येत आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चा सुरू असतानाच राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गुरूवारचे सर्व नियोजित कार्यक्रम सह्याद्री अतिथी गृह इथं आहेत. तर, राज ठाकरे यांचा ठाण्यात नियोजित दौरा आहे. मात्र दोन्ही नेत्यांनी आपले नियोजित कार्यक्रम बाजूला ठेवून अचानक वांद्रे इथल्या एका हॉटेलमध्ये भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.

ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात मुख्यमंत्र्यांची एन्ट्री : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात वांद्रे इथल्या एका हॉटेलमध्ये ही बैठक झाली. ही बैठक सुमारे दीड तास चालली. यात भाजपाचे नेते मोहित कंबोज तसंच मनसेचे प्रमुख नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि संदीप देशपांडे देखील उपस्थित होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र निर्माण सेनेची युती होईल अशा चर्चा सध्या महाराष्ट्रात सुरू आहेत. या चर्चा सुरू असतानाच अचानक ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात थेट देवेंद्र फडणवीस यांची एन्ट्री झाल्यानं राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या आहेत.

या भेटीला राजकीय अर्थ? : "राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात जी भेट झाली त्याला निश्चितच राजकीय अर्थ आहे. जेव्हा राज ठाकरे भेटतात तेव्हा एकतर सूचना देतात किंवा काही वेळ त्यांचे काम असते. त्यामुळे या भेटीवर आपण तर्कवितर्क लावणं चुकीचं आहे. उद्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये काय समीकरण असतील? काय चित्र असेल? यावर आपण बोलणं चुकीचं आहे. ही भेट नक्की कशासाठी झाली यावर स्वतः राज ठाकरे किंवा मुख्यमंत्री बोलतील." अशी प्रतिक्रिया मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे.

कोणाला भेटावं आणि कोणाला नाही हा त्यांचा प्रश्न : "महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीत एकत्र येण्याबाबत राज ठाकरे यांनी जी काही प्रतिक्रिया दिली त्याला आमच्या पक्षानं आणि नेत्यांनी देखील सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांच्या मनात काय आहे हे नेमकं कळलेलं नाही. त्यांनी या विषयावर एक मोठं मौन साधलेलं आहे. मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांची भेट नेमकी कशासाठी होती हे अद्याप कळलेलं नाही. त्यांनी कोणाला भेटावं आणि कुणाला भेटू नये हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे." अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली आहे.

नेते भेटले की राजकीय चर्चा होतेच : "दोन नेते भेटले की राजकीय चर्चा ही होणारच. भाजपा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे जरी दोन वेगवेगळे पक्ष आहेत. दोन पक्षांचे नेते भेटले तरी राजकारणा पलीकडं जाऊन आपले वैयक्तिक हितसंबंध आणि मैत्री जपणं ही यशवंतराव चव्हाण यांच्यापासून महाराष्ट्राची संस्कृती आहे. या भेटीचा लगेच महानगरपालिका निवडणूक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाशी सबंध जोडणं चुकीचं आहे. पण दोन राजकीय नेते भेटले की त्यांच्यात राजकीय चर्चा ही होतेच. हे देखील आपण मान्य केले पाहिजे." अशी प्रतिक्रिया आमदार राम कदम यांनी दिली.

ऑपरेशन सिंदूरविरोधात बोलणारे राज ठाकरे एकमेव नेते : या बैठकीपूर्वी राज ठाकरे यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. "जिंकलेल्यांनीही मला फोन करून हे निकाल धक्कादायक असल्याचं सांगितलं." असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. इतकंच नव्हे तर ऑपरेशन सिंदूरबाबत देखील सरकार विरोधात बोलणारे राज ठाकरे हे एकमेव नेते आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीबाबत आम्ही मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क झाला नाही.

हेही वाचा :

  1. "शेतकरी नैराश्यात बुडाला तर..."; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला इशारा
  2. "मला अफजलखान म्हणतात, मग मोदी शाह यांना चंगेज खान म्हणायचं का?" - माजी आमदार अनिल गोटे
  3. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस