छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) - एकाच पक्षाचे झालेल्या दोन पक्षातील नेत्यांवर एकमेकांवर होणारी टीका सध्या चर्चेचा विषय झाली आहे. ही चर्चा आहे दोन्ही शिवसेनेतील. त्यामध्ये ठाकरे शिवसेनेचे चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे हे दोन नेते एकमेकांच्या उघडपणे तर शिंदे शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरे हे माजी खासदार खैरे यांच्यावर, दानवे आणि भुमरे यांच्यावर उघड टीका करताना दिसत आहेत. त्यामुळे शिवसेनेत चाललंय तरी काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.
भुमरे यांनी केली टीका - दोन्ही शिवसेना पक्षातील नेते एकमेकांवर कडाडून टीका करताना दिसत आहेत. त्यामध्ये जिल्ह्याचे खासदार संदीपान भुमरे यांनी ठाकरे पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यावर नाव घेत उघड टीका केलीय. अंबादास दानवे कागदोपत्री नेता असल्याचा पुनरुच्चार त्यांनी करत, मला एक सांगायचं आहे की त्यांनी सांगावे सहा वर्षात त्यांनी काय काम केले. दानवेंनी माझ्यावर आरोप केला की भुमरे साहेबांनी एमएलडी सांगावं, जायकवाडीचे धरणच माझ्या मतदारसंघात आहे. त्यामुळे मला ते शिकवण्याची गरज नाही, मी एवढ्या वेळेस आमदार राहिलो आता खासदार आहे तरी तेच हे बोलत आहेत की भुमरे यांनी हे सांगावे ते सांगावे. दानवे आमच्या संपर्कात असण्याचा प्रश्न नाही, आमच्याकडे खूप लोक आहेत, त्यांची गरज नाही अशी टीका दानवे यांच्यावर भुमरे यांनी केली.
खैरे यांना आमच्या शिवसेनेत स्थान नाही - शिंदे शिवसेनेचे दरवाजे चंद्रकात खैरे यांच्यासाठी उघडे असल्याचं पक्षाचे प्रवक्ते आणि समाज कल्याणमंत्री संजय शिरसाट यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते. तर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी चंद्रकांत खैरे यांना काय ऑफर दिली माहीत नाही. मात्र ते येणार नाहीत, कारण चंद्रकांत खैरे सांगतात की मी एकनिष्ठ आहे आणि आम्ही गद्दार आहोत तर तुम्ही कशाला आमच्याकडे येता, तुम्ही आहे तिथेच राहा. अनेक वर्ष तुम्ही पदं भूषवलीत आता तुम्ही घरी राहावे, मी खासदार म्हणून सांगतोय की त्यांना आमच्या पक्षात प्रवेश नाही असे स्पष्ट विधान भुमरे यांनी केले.
खैरे यांची दानवे यांच्यावर टीका - लोकसभा निवडणुकीत शिवसेनेकडून शिवसेनेचा पराभव झाला. शिंदे शिवसेनेचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी ठाकरे शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला. त्यानंतर अनेक वेळा दोघांमध्ये शाब्दिक टीका होताना दिसली. भुमरे यांनी खैरे यांच्यासाठी पक्षाचे दरवाजे बंद असल्याचे सांगितल्यावर भुमरे यांनी निवडणुकीत 120 कोटी वाटले म्हणून निवडून आले, पैसे वाटले, दारू वाटली... दारू पाजून मतं घेतली... त्या थर्ड क्लास माणसाबद्दल मला बोलायचे नाही अशी टीका खैरे यांनी केली. त्यानंतर त्यांनी स्वतःच्या पक्षाचे नेते अंबादास दानवे यांच्यावर टीका केली. ते स्वतःला मोठा समजत असल्याची तक्रार उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. सध्या उद्धवजी अडचणीत आहेत, त्यांना साथ देण्याची गरज असल्याने एकत्र काम केले पाहिजे मात्र तसे होत नसल्याचे खैरे यांनी सांगितले.
दानवे यांनी केली शिंदे शिवसेनेवर टीका - विरोधीपक्ष नेते तथा ठाकरे शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी प्रतिउत्तर दिले. टीका करणारे खासदार भुमरे संसदेत बोलतात का? प्रश्न विचारला का? अशी टीका त्यांनी केली. मनसे भाजपाचा राबवता न येणार अजेंडा राबवते. अमराठी माणूस मराठी झाला असेल तर त्याचं स्वागत आहे ही आमची भूमिका आहे. आडनाव मराठी असले पाहिजे. आमच्या पक्षाचा मेळावा होता तेव्हा खैरे साहेब अर्जंन्ट नागपूरला गेले होते, समाजाला मेळ्यावाला गेले होते अशी मला माहिती आहे. त्यांचे नाव मी मार्गदर्शक म्हणून टाकले होते, ते का आले नाहीत हे त्यांना विचारा असं म्हणत खैरे यांच्या आरोपांवर बोलणे त्यांनी टाळले.