मुंबई- मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून, आगामी काळात मुंबई ही फिनटेकची राजधानी होईल. वर्ष 2028 ते 2030 पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था ट्रिलियन अर्थव्यवस्था होईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय. वांद्रे वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. राज्य आता वेगवान गतीने पुढे चाललंय, देशातील सर्वात विकसित राज्य बनवण्याच्या हेतूने राज्यात एक सल्लागार समिती तयार करण्यात आली असून, त्यांच्या अहवालानुसार महाराष्ट्र कुठल्या क्षेत्रात प्रथमस्थानी जाईल, याचा अभ्यास केला जातोय. या अहवालाच्या अभ्यासाद्वारे राज्याचे पुढील धोरण ठरवले जाईल, असंही देवेंद्र फडणवीस म्हणालेत.
पाश्चिमात्य संस्कृती आणि भारतीय संस्कृतीमध्ये मूलभूत फरक : देशाची लोकसंख्या हे सध्या उपलब्ध असलेले मनुष्यबळ असून, हे विकासाचं महत्त्वाचं साधन असल्याचं मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलंय. पाश्चिमात्य संस्कृती आणि भारतीय संस्कृतीमध्ये मूलभूत फरक आहे, त्या संस्कृतीमध्ये सक्षम असलेल्यांना विकासाची संधी मिळते. मात्र, भारतीय हिंदू संस्कृतीत प्रत्येक व्यक्तीला विकासाची संधी मिळते, असंही देवेंद्र फडणवीसांनी अधोरेखित केलंय. यावेळी वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरमचे संस्थापक स्वामी विद्यानंद, फोरमचे अध्यक्ष राजेश शर्मा, पद्मश्री टी. व्ही. मोहनदास पै, शैलेश त्रिवेदी यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर यावेळी उपस्थित होते.
25 कोटी जनता दारिद्र्यरेषेच्या वर आणण्यात सरकारला यश : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या विचारांवर मार्गक्रमण करत देशाच्या विकासाला गती देणारी धोरणे आखली. गेल्या 10 वर्षांमध्ये 25 कोटी जनता दारिद्र्यरेषेच्या वर आणण्यात सरकारला यश मिळालंय. हिंदू विकासाचे मॉडेल नरेंद्र मोदींनी जगासमोर आणल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणालेत. हिंदू चिंतनावर आधारित विकास करून आपण पुढे येत असल्याने देशात भारताला दिशादर्शक देश म्हणून ओळख मिळल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणालेत. देशात 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत आल्यापासून देशातील पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणाला गती मिळाली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेत.
महाराष्ट्राच्या विकासाची एक पूरक साखळी तयार : जागतिक पातळीवरील विकासाला जोडून महाराष्ट्राच्या विकासाची एक पूरक साखळी बनवली जातेय. पायाभूत सुविधा वाढवल्याने त्याचा लाभ राज्यातील सर्वसामान्य जनतेला होईल, असे ते म्हणाले. रस्ते, विमान सेवा, बंदरांचा विकास अशा पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यावर राज्य सरकारचा भर असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय.
हेही वाचा-