अमरावती : अमरावतीचे सुपुत्र असणारे देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार सोहळा अमरावती वकील संघाच्यावतीनं करण्यात येणार आहे. येत्या बुधवारी सायंकाळी 6 वाजता पोटे अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्वामी विवेकानंद सभागृहात या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भातील माहिती अमरावती वकील संघाचे अध्यक्ष अॅड. सुनील देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
25 जूनला सत्कार सोहळ्याचं आयोजन : "सध्या न्यायालयाला सुट्ट्या आहेत. यामुळं सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांना सत्कारासाठी नागपूर आणि औरंगाबाद वकील संघाच्यावतीनं निमंत्रित करण्यात आलं आहे. असं असताना सरन्यायाधीश म्हणून त्यांनी आपला पहिला सत्कार आपलं गाव असणाऱ्या अमरावती वकील संघाच्यावतीनं स्वीकारणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यांनी 25 जून ही तारीख स्वतः दिली आहे. भूषण गवई यांनी सुरुवातीच्या काळात ज्येष्ठ अधिवक्ता राजाभाऊ भोसले यांच्या मार्गदर्शनात अमरावती जिल्हा न्यायालयात वकील म्हणून 1985 ते 1986 या दरम्यान काम केलं आहे. यामुळं जिथून आपल्या कामाची सुरुवात झाली, त्या अमरावती न्यायालयातील वकील संघाच्या सत्कार सोहळ्याला पहिला मान देत आहेत," असं अॅड. सुनील देशमुख यांनी सांगितलं.
'हे' मान्यवर उपस्थित राहणार : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या अमरावतीमधील आयोजित सत्कार सोहळ्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती नितीन सांबरे, न्यायाधीश अनिल किलोर, न्यायमूर्ती प्रवीण पाटील आणि न्यायाधीश सुधाकर यार्लागड्डा हे उपस्थित राहणार आहेत. यासोबतच बार कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोव्याचे सदस्य व पालक सदस्य अॅड. पारिजात पांडे उपस्थित राहणार असल्याचं अॅड. सुनील देशमुख यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा -