छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) - जगप्रसिद्ध असलेल्या अजिंठा वेरूळ लेण्यांमध्ये मधमाश्यांचा हल्ला होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मागील काही दिवसांमध्ये पाच ते सहा वेळा हा हल्ला झाला. त्यामध्ये विदेशी पर्यटकांसह देशी पर्यटकदेखील जखमी झाले आहेत. पुरातत्व विभागानं देखभाल दुरुस्ती करत असताना मधमाश्यांचं मोहोळ काढणे आवश्यक आहे. मात्र, तसं होत नसल्यानं या घटना वाढत चालल्याचा आरोप इतिहास अभ्यासक डॉ. दिलीप पाईकराव यांनी केलाय. आता पर्यटकांनीच काळजी घेण्याचं त्यांनी आवाहन केलं आहे. तर अशा घटनांमुळे चुकीचा संदेश जात असल्याचं मत व्यावसायिक जसवंत सिंग यांनी व्यक्त केलं.
मधमाश्यांचे हल्ले वाढले- छत्रपती संभाजीनगर हे जागतिक पर्यटन स्थळाच्या नकाशावर असलेलं शहर आहे. प्रत्येक वर्षी लाखो देशी- विदेशी पर्यटक पर्यटनासाठी जिल्ह्यात दाखल होतात. अजिंठा-वेरूळ येथील लेणी हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. मात्र, याच लेण्या पाहण्यासाठी गेलेल्या पर्यटकांना मधमाश्यांच्या हल्ल्यात जखमी व्हावं लागलं आहे. मार्च महिन्यात सात ते आठ वेळा मधमाश्यांनी पर्यटकांवर हल्ला चढवला आहे. यामध्ये दहा ते बारा विदेशी आणि तीस ते चाळीस देशी पर्यटक जखमी झाले आहेत. लेणी पाहण्याचा आनंद घेत असताना अचानक झालेल्या हल्ल्यामुळे धावपळ उडते. बचावासाठी पळत असतानादेखील काही पर्यटक पडल्यानं जखमी झाले आहेत. मधमाश्या मोठ्या प्रमाणात चावल्यानं काही पर्यटकांची प्रकृती चिंताजनक झाली होती, अशी माहिती पर्यटन व्यावसायिक जसवंत सिंग यांनी दिली.
पर्यटन व्यवसायावर परिणाम- जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी अनेक प्रयत्न केले जातात. अजिंठा आणि वेरूळ लेणीची देखभाल दुरुस्तीसाठी एक दिवस परिसर पर्यटकांसाठी बंद केला जातो. अजिंठा लेणी सोमवारी आणि वेरूळ लेणी मंगळवारी बंद ठेवली जाते. या दिवशी स्वच्छता, देखभाल दुरुस्ती बाबत कामे करणे अपेक्षित आहे. मात्र, त्याबाबत पुरातत्व विभाग गंभीर नसल्याचं पाहायला मिळतं. मधमाश्यांचे पोळ बसल्यावर तातडीने ते काढले पाहिजे. जेणेकरून अशा घटना होणार नाही. मात्र, पुरातत्व विभाग वनविभागाकडे, तर वनविभाग पुरातत्व विभागाकडे बोट दाखवतात. त्यात हा प्रश्न सुटत नाही. परिणामी मधमाश्यांमुळे जखमी झालेले पर्यटक नकारात्मक मानसिकतेने जातात. त्यातून पर्यटन कमी होण्याची भीती आहे, असं मत पर्यटन व्यावसायिक जसवंत सिंग यांनी व्यक्त केलं.
पर्यटकांनीच घ्यावी काळजी- मधमाश्यांचे पोळ बसल्यावर तर छोटे असतानाच काढणं आवश्यक असतं. मधमाश्यांची घ्राणेंद्रिय तीक्ष्ण असतात. त्या कोणताही गंध लगेच घेऊ शकतात. त्यामुळे लेणी पाहण्यासाठी जाताना काही काळजी घ्यावी, असं आवाहन इतिहास अभ्यासक डॉ. पाईकराव यांनी केलं.
• लेणी परिसरात जाताना उग्र वास असलेला परफ्यूम मारू नका.
• लाल आणि काळ्या अशा गडद रंगाचे कपडे परिधान करू नका.
• मधमाश्या स्वतःला असुरक्षित मानतात. त्यामुळे थोडा गोंधळ झाला तर त्या लगेच हल्ला करू शकतात. लेणी पाहताना शांततेत पाहावी. गोंधळ, आराडाओरड करू नये.
- अशा पद्धतीची काळजी घेतल्यास मधमाश्यांपासून बचाव करता येईल, असं मत इतिहास अभ्यासक डॉ. पाईकराव यांनी व्यक्त केलं. तर दरवर्षी अशा घटना होतात. विशेषतः उन्हाळ्यात मधमाश्यांची चिडचिड होते. त्या काळात घटना वाढतात. पुरातत्व विभागानं तत्काळ पाऊल उचललं पाहिजे, अशी मागणीदेखील डॉ पाईकराव यांनी केली.
पुरातत्व विभाग घेते बघ्याची भूमिका- मधमाश्यांचे हल्ले वाढत असताना पुरातत्व विभाग मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप अभ्यासक डॉ संजय पाईकराव यांनी केलाय. वेरूळ लेणी मुख्य रस्त्यावर असल्यानं तिथे घटना घडल्यास तत्काळ उपचारासाठी जाणं शक्य होतं. मात्र, अजिंठा लेणी मुख्य रस्त्यापासून पाच किलोमीटर आत आहे. पर्यटकांची वाहने लेणी परिसरात घेऊन जाण्यास निषिद्ध केले असल्यानं शासनानं दिलेल्या बसद्वारे जावे लागते. विशेष म्हणजे जखमी झालेल्या लोकांना पुरातत्व विभाग रुग्णालयात घेऊन जात नाही. त्यांना स्वतःला रुग्णालय गाठावे लागते. अशात तिथे घटना घडल्यास उपचारदेखील लवकर मिळणं अवघड जाते. एखाद्या पर्यटकाला गंभीर दुखापत झाली, त्यातून काही दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न डॉ. संजय पाईकराव यांनी उपस्थितीत केला.
मधमाश्या स्वतः करत नाहीत हल्ला- मधमाश्या त्यांना अडचण निर्माण झाल्याशिवाय हल्ला करत नाहीत, अशी माहिती मत नाशिक येथील मधमाशी अभ्यासक अनंत खाडिलकर यांनी व्यक्त केलं. मधमाश्या त्यांचं पोळं तयार करताना नैसर्गिक पद्धतीनं अनुकूल असलेल्या जागेवर काम करतात. फुलांमधून पुष्परस, परागकण, पाणी त्या घेऊन येतात. त्यावेळी त्यांच्या कामात व्यत्यय निर्माण झाला तरच त्या हल्ला करतात. त्यांचं काम होत असताना अडचण आल्यास त्या वैतागतात. प्रतिक्रिया म्हणून हल्ला होतो, अशी माहिती मधमाशी अभ्यासक खाडिलकर यांनी दिली.