नागपूर : शहराला होणारा पाणीपुरवठा, नाग नदी, पोहरा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प, नागपूरमधील शासकीय कॅन्सर रुग्णालयाला निधी उपलब्ध करून देण्यासह अनेक विषयांवर आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत नागपूर महानगरपालिकेत आढावा बैठक घेण्यात आली. याशिवाय शहरातील सीताबर्डी भागातील हॉकर्सच्या प्रश्नावर तोडगा काढण्याच्या सूचना नितीन गडकरी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या आढावा बैठकीत नागपूर शहरातील बहुतांश आमदार उपस्थित होते. तर महिन्याभरात या सर्व विषयांवर कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जातील, असं बावनकुळे यांनी सांगितलं. नागपूर जिल्ह्याची ओळख असलेली नाग नदी, पिवळी नदी, पोहरा नदी यांचे पुनर्जीवनाचा विषय बैठकीत चर्चेला आला होता.
शरद पवारांच्या सूचनांचे महाविकास आघाडीचे नेते पालन करतील : खासदार संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी हे सैनिकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. आपले सैनिक देशाचं रक्षण करत आहेत. मात्र, दुर्दैवाने त्यावरही राजकारण करण्याचं काम महाविकास आघाडीचे नेते करत आहेत. शरद पवारांनी या नेत्यांचे कान टोचले आहेत. शरद पवार यांनी दिलेल्या सूचना महाविकास आघाडीचे नेते ऐकतील, असा विश्वास वाटत असल्याचं बावनकुळे म्हणाले.
म्हणून तिरंगा यात्रा काढल्या जात आहेत : युद्धाच्या विजयाचा जल्लोष कोणीच केला नाही. सैनिकांचं प्रोत्साहन वाढवणं त्यांचा अभिनंदन करण्यासाठी आणि दहशतवाद्याना संपवण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी सैन्याच्या माध्यमाने करत असताना, त्यांच्यापाठीशी उभे राहिलं पाहिजे यासाठी 'तिरंगा यात्रा' काढली जात आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीवर विश्वास ठेवावा : प्रकाश आंबेडकर सरकारमध्ये नाही किंवा सरकारच्या मंत्रिपदावरही नाहीत. त्यामुळं त्यांना माहिती नाही. सरकार प्रत्येक गोष्टी उघड करत नाही. दहशतवाद विरोधात कारवाई केली जात असताना बऱ्याच गोष्टी गुप्त ठेवाव्या लागतात. संरक्षण संबंधित माहिती त्या ठिकाणी गोपनीय ठेवावी लागते. दहशतवादांना संपवण्याचं काम केंद्रसरकार करत आहे. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास ठेवावा, असं बावनकुळे म्हणाले.
राज्य सरकारने मागितली माफी : देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई मुंबईत आले असताना प्रोटोकॉल पाळला गेला नाही. त्याची दखल राज्याचे मुख्यमंत्री यांनी घेतली आहे. मी स्वतः त्यांना फोन केला आणि सरकारच्यावतीनं माफी मागितली, असल्याचं बावनकुळे म्हणाले. पुढच्या काळात असं होणार नाही याची काळजी महाराष्ट्र सरकार घेईल, असं ते म्हणाले.
शेतकऱ्यांना बोगस बियाणे मिळणार नाहीत : देशाचे केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंग चव्हाण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी बैठक घेतली आहे. या बैठकी बोगस बियाणं विकणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल होतील अश्या सूचना देण्यात आले आहे. बोगस बी-बियाणे शेतकऱ्यांना मिळणार नाही, याची राज्य सरकारकडून काळजी घेतली जाणार असल्याचं बावनकुळे म्हणाले.
२२ लाख उतारे दुरुस्ती होणार : शेतकऱ्यांचे सर्व सातबारा, उतारे दुरुस्त केले जाणार आहे. सरकारकडून सातबारा मोहीम राबवायला सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांची युनिक आयडी तयार करत आहोत. प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरच्या लोकांना मोफत सोलर पॅनल मोफत देणार आहे.
हेही वाचा -