चंद्रपूर : जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सुकर होत असताना रविवारी घडलेल्या घटनांनी चंद्रपूर जिल्हा हादरून गेला आहे. एकाच दिवशी जिल्ह्यात दोन हत्या, अल्पवयीन मुलीवर अत्याचार, हत्तीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू तर बोगस बियाणं तस्करीवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. सोनम रघुवंशीनं राजा रघुवंशीची निर्घृण हत्या केल्यानं देशभर खळबळ उडाली. मात्र चंद्रपूरमध्येही एका पत्नीनं पतीची हत्या केल्यानं मोठी खळबळ उडाली.
खोटं बोलून केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार : भद्रावती पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या जुना सुमठाणा येथील 30 वर्षीय आरोपीनं 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला तिच्या आईनं यायला सांगितलं, अशी बतावणी करत बोलावून घेतलं. ती घरी येताच दार बंद करून तिच्यावर अत्याचार केला. याबाबतची माहिती मुलीनं नातेवाईकांना दिली. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवत आरोपीला बेड्या ठोकल्या. आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साटम करत आहेत.
ज्येष्ठ महिलेची निर्घृण हत्या, आरोपी अज्ञात : राजुरा शहरातील रमाई नगर इथं एक ज्येष्ठ महिलेची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. मात्र हत्येचं कारण आणि आरोपी अद्याप अज्ञात आहेत. शहरातील रमाई नगर इथं कविता रायपुरे (वय 55) ह्या राहत होत्या. त्या आपला मुलगा सुरेश रायपुरे याच्या सोबत राहत होत्या. सुरेश हा खासगी संस्थेत सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत आहे. कविता रायपुरे यांच्या घरी किराणा दुकान आहे. तर शेजारीच कविता रायपूरे यांची मुलगी ममता अलोणे राहते. शनिवारी रात्री सुरेश कामावर चालला गेला. रविवारी सकाळी दूध नेण्यासाठी मुलगी ममता आली असता घरासमोरील गेटला कुलूप लावलेलं होते. अनेकदा आवाज देऊनही कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. गेट ओलांडत दार ठोठावण्यात आलं, मात्र यावरही कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. ममतानं खिडकी उघडून बघितलं असता, कविता रायपुरे या बेडवर पडलेल्या दिसून आल्या. याबाबतची माहिती राजुरा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी दार उघडून बघितलं असता कविता या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. आरोपीनं त्यांच्या डोक्यावर अनुकुचीदार शस्त्रानं जोरदार मार केल्याची चिन्हं होती. मात्र हा खून कोणी केला असावा आणि यामागचं कारण काय, याचा कसून शोध पोलीस घेत आहेत, मात्र याचा अद्याप सुगावा लागला नाही.
पत्नीनं केली पतीची हत्या : कौटुंबिक वाद विकोपाला जाऊन पत्नीनं पतीचा खून केल्याची घटना सिंदेवाही तालुक्यात घडली. नवीन जामसाळा या गावातील दुर्वास चौधरी आणि वैशाली चौधरी यांच्यात नेहमीच खटके उडायचे. त्यांना दोन मुले आहेत. पती दुर्वास याला दारूचं व्यसन जडल्यानं वादाचं पर्यवसान भांडणात व्हायचं आणि वाद विकोपाला जायचा. दुर्वास दारू पिऊन आल्यावर पत्नीला मारहाण करायचा. हा नित्यक्रम होऊन गेला होता. अशाच प्रकारे शनिवारी (ता. 14) यांच्यात कडाक्याचं भांडण झालं. मात्र वैशालीनं रात्री दुर्वास झोपला असता रुमालानं गळा आवळुन खून केला. रविवारी सकाळी ही घटना समोर आली. मृतकाची आई सुनंदा चौधरी यांनी दुर्वासला आवाज दिला असता, त्यानं कुठलाही प्रतिसाद दिला नाही. यावेळी तो निपचित पडल्याचं दिसून आलं. सुनंदा यांच्या तक्रारीवरून सिंदेवाही पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली आहे.
12 लाखांचं बोगस बियाणं जप्त : राज्यात चोर बीटी या कापसाच्या बियाण्यांवर बंदी आहे. मात्र चंद्रपुरात याचा कोट्यवधीचा अवैध व्यवसाय केला जातो. बल्लारपुरात अशीच मालाची तस्करी करताना पोलिसांनी 12 लाखांचं बोगस बियाणं जप्त केलं. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा आणि बल्लारपूर पोलिसांनी केली. बल्लारपूर चंद्रपूर महामार्गावर चोर बीटी बियाण्याची वाहनानं तस्करी केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार या मार्गावरील विसापूर टोल नाक्यावर सापळा रचण्यात आला. इतक्यात एमएच 40 एबी 2356 हे वाहन आलं, असता त्याची झडती घेण्यात आली. यात 800 नग प्रतिबंधित असलेलं पुष्पा संशोधित हायब्रीड कापूस बियाणं आढळून आलं. हा संपूर्ण माल 12 लाखांचा आहे. त्यानुसार पोलिसांनी चालक मालक यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. या वर्षी चोर बीटीवर केलेली ही मोठी कारवाई मानली जात आहे.
जंगलातील जुगार अड्ड्यावर छापेमारी : नागभीड तालुक्यातील राजूली जंगल परिसरात मोठ्या प्रमाणात जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानुसार छापेमारी करण्यात आली. मात्र जंगलाचा आसरा घेत अनेक आरोपी पळून जाण्यात यशस्वी ठरले. यात दोन आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलं. इथून सहा दुचाकी आणि दोन मोबाईल, जुगाराचं साहित्य आणि 27 हजार रोख जप्त करण्यात आलं.
हत्तींनी घेतला पहिला बळी : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून दोन हत्तींचा हैदोस सुरू आहे. यात एका वृद्ध व्यक्तिचा बळी गेला आहे. सिंदेवाही तालुक्यातील जाटलापूर गावालगत रविवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. मारोती कवडू मसराम (वय 60) असं मृतकाचं नाव आहे. सकाळी शेतकरी धान पेरणीसाठी शेताकडं जात असताना गावालगतच्या जंगलातून अचानक हत्ती बाहेर आले. त्यांनी शेतकऱ्यांचा पाठलाग करत हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी शेतकरी सैरावैरा पळत सुटले. याच दरम्यान मारोती मसराम हे शौचासाठी घराबाहेर पडले होते. अपंगत्वामुळे ते पळू शकले नाहीत. त्यामुळे हत्तींनी त्यांच्यावर हल्ला चढवला. यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. एकानं त्यांना पायानं चिरडलं, तर दुसऱ्यानं सोंडेनं उचलून जमिनीवर आदळलं, यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
हेही वाचा :