बारामती (पुणे) : अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाची आज चैत्र पौर्णिमेची यात्रा सुरू झाली. या यात्रेनिमित्त मोठ्या संख्येनं भाविक जेजुरीमध्ये आले आहेत. पहाटे पाच वाजता मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं करण्यात आलं. तेव्हापासून सुरू झालेली गर्दी वाढत गेली. "आज दिवसभरात साधारणता एक ते दीड लाख भाविक खंडोबाचे दर्शन घेतील," असा अंदाज मंदिर प्रशासनानं व्यक्त केलाय.
चैत्र पौर्णिमेला भगवान शंकराने घेतला होता खंडोबाचा अवतार : त्रेता युगामध्ये म्हणजे आज पासून १३ हजार वर्षापूर्वी भूतलावार मली आणि मल्ल या असुरांनी उच्छंद मांडला होता. देवकार्य करण्यासाठी ते अडथळा निर्माण करत होते. यावेळी जेजुरीजवळ लवठेश्वर इथं असणाऱ्या सप्त ऋषींनी भगवान शंकराला या असुरांचा बंदोबस्त करण्याची विनंती केली. त्यांच्या विनंतीला मान देऊन भगवान शंकरानं मार्तंड भैरवाचा म्हणजेच खंडोबाचा अवतार धारण केला. चैत्र पौर्णिमेला शंकरानं हा अवतार घेतला. भगवान शंकरासोबत नेहमी नंदी असतात. मात्र, यावेळी अवतार धारण करताना खंडोबा देवांनी घोड्याबरोबर अवतार धारण केला. म्हणजेच त्यांनी या अवतार कार्यासाठी घोडा हे वाहन निवडलं. यानंतर खंडोबा देवानं मली आणि मल्ल या दोन्ही आसुरांचा संहार केला.
या दिवशी खंडोबा मंदिरात होते शिखर काठ्यांची भेट : जेजुरीच्या खंडोबाचे भक्त अनेक गावांत आहेत. त्या भक्तांच्या गावातून काही शिखर काठ्या आजच्या दिवशी खंडोबाच्या भेटीला येत असतात. खंडोबाच्या मंदिर परिसरामध्ये या शिखर काठ्या नाचवल्या जातात. यानंतर या काठ्या खंडोबाच्या शिखराला लावून शिखर भेट घेण्याची परंपरा आहे. त्याला शिखर काठ्यांची भेट देखील म्हटलं जातं. ज्या गावांमध्ये खंडोबाचे मंदिर आहे. अशा गावांमधून या शिखर काठ्या देवाच्या भेटीला येतात. त्याचबरोबर राज्यभरातून अनेक भक्त आपल्या देवघरातील देव, देवभेटीसाठी घेऊन येतात. यावेळी तळीभंडार कुलधर्म कुलाचार केला जातो.
खंडोबाच्या पूजेला वापरला जातो दवणा : भगवान शंकराला जसं भस्म प्रिय आहे, तसंच दवणा देखील प्रिय आहे. भगवान शंकराच्या पूजेमध्ये नेहमी सुगंधी दवण्याचा वापर केला जातो. खंडोबा हा देखील भगवान शंकराचा अवतार आहे. त्यामुळं चैत्र पौर्णिमेला खंडोबाची जेव्हा पूजा केली जाते. त्यावेळी मंदिराची संपूर्ण सजावट दवण्यापासून केली जाते. विशेष म्हणजे हा दवणा जेजुरीमध्यवल्या दवणेमळा या ठिकाणी पिकवला जातो.
हेही वाचा :