मुंबई : तारीख 9 जून 2025... वार सोमवार... मुंबईकरांचा आठवड्याचा पहिलाच दिवस हा एका दुःखद बातमीनं सुरू झाला. सकाळी कामावर जाताना आणि काही जण कामावरून परतीचा प्रवास करताना अप आणि डाऊन मार्गावरील दोन जलद लोकलमधील प्रवाशांचा धावत्या लोकलमधून खाली पडल्यानं अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. तर, आठ जण गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर मध्य रेल्वेनं आपली जुनी योजना पुन्हा एकदा प्रभावीपणे राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, मध्य रेल्वेनं 117 रेल्वे स्थानकांवर पॅनिक बटन बसविली आहेत.
पॅनिक बटन बसवण्याचा निर्णय : मुंबईत दररोज 30 लाख प्रवासी लोकलनं प्रवास करतात. आधीच लोकल गाड्या कमी, त्यात आहेत, त्या पण गाड्या वेळेत नाहीत. त्यामुळं मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर दररोज प्रवाशांची तुडुंब गर्दी असते. अशातच लोकल डब्यातील भांडणं, बाचाबाची होणं हा मुंबईकरांच्या प्रवासाचा एक नेहमीचा भाग बनला आहे. या गर्दीचा फायदा घेऊन अनेकदा मोबाईल, पर्स तसंच मौल्यवान वस्तूंची चोरी केल्याच्या घटना देखील घडत असतात. या सर्व घटनांना आळा घालण्यासाठी तसंच मुंबईकरांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं आणि प्रवाशांना तात्काळ मदत पोहोचावी, यासाठी मध्य रेल्वेने पॅनिक बटन बसवण्याचा निर्णय घेतला आहे.
सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर काम : या संदर्भात मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी "ईटीव्ही भारत"शी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितलं की, "2023 मध्ये मुंबईतील रेल्वे स्थानकांवर पॅनिक बटन बसवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर मुंबईतील काही रेल्वे स्थानकांवर हे पॅनिक बटन बसवण्यात आले. पुढं टप्प्याटप्प्यानं अन्य रेल्वे स्थानकांवर हे बटन बसवण्याचे नियोजन होतं. 2023 पासून या कामाला प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात झाली. सुरुवातीला मुंबईतील भायखळा, वडाळा या स्थानकांवर ही पॅनिक बटन बसवण्यात आली," अशी माहिती डॉ. स्वप्नील नीला यांनी दिली.
आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ मदत : "रेलटेल कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड म्हणजेच आरसीआयएलकडून मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गांवर पॅनिक बटन बसवण्यात आली आहेत. ज्या काही स्थानकांवर ही बटन बसवण्यात आली आहेत. त्यामध्ये भायखळा, चिंचपोकळी, करी रोड, मुलुंड, डॉकयार्ड रोड आणि कॉटन ग्रीन यांचा समावेश आहे. पॅनिक बटन बसवण्याचा निर्णय प्रवाशांना विशेषतः महिलांना आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ मदत मिळावी, यासाठी घेण्यात आला आहे. जेव्हा एखादा प्रवासी पॅनिक बटन दाबतो. तेव्हा आरपीएफ नियंत्रण कक्ष आणि स्टेशन कर्मचाऱ्यांना अलर्ट पाठवला जातो. कंट्रोल रूमला अलर्ट प्राप्त होताच सीसीटीव्ही फुटेजद्वारे परिस्थितीचं मूल्यांकन करून त्वरित मदत पाठवून आवश्यक ती कारवाई केली जाते," डॉ. स्वप्नील नीला यांनी सांगितलं.
पॅनिक बटन हे अलार्म चेन सिस्टीमसारखेच : दरम्यान, मुंब्रा अपघातानंतर मध्य रेल्वेनं पॅनिक बटनचा का विचार केला? असा सवाल "ईटीव्ही भारत"च्या प्रतिनिधींनी डॉ. स्वप्नील नीला यांना विचारले. तेव्हा त्यांनी सांगितलं की, "पॅनिक बटन हे ट्रेनमधील अलार्म चेन सिस्टीमसारखेच आहे. याचा फायदा असा आहे की, मध्य रेल्वेची सर्व रेल्वे स्थानकं एका कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत पूर्णपणे सीसीटीव्ही कव्हरखाली असतात. त्यांचे 24x7 निरीक्षण केलं जातं. पण, काही वेळा काही घटना निदर्शनास येत नाहीत. मुंब्रा अपघातासारख्या घटना पुन्हा होऊ नयेत सोबतच प्रवाशांना तात्काळ मदत मिळावी, यासाठी पॅनिक बटन ही एक सुविधा आहे," असं डॉ. स्वप्नील नीला यांनी सांगितलं.
हेही वाचा -