धुळे : धुळे कृषी उत्पन्न बाजार समितील (Dhule Krushi Utpanna Bazar Samiti) दर मंगळवारी आणि बुधवारी गुरांचा बाजार भरत असल्यानं परिसर कायम गजबजलेला असतो. होळी, धुलीवंदन असो किंवा कोणताही सण असो या दिवशी बाजारात मोठी गर्दी उसळते. मात्र, दीड ते दोन दशकानंतर यंदा प्रथमच गुरांचा बाजार तीन जून ते आठ जून या कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळं काल आणि आज गुरांच्या बाजारात शुकशुकाट पाहायला मिळाल्याची माहिती युवासेना जिल्हाप्रमुख हरीश माळी यांनी दिली.
गुरांच्या बाजारात लाखोंची उलाढाल : धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दर मंगळवारी भरणाऱ्या गुरांच्या बाजारात लाखोंची उलाढाल होत असते. जिल्हाभरातून शेतकरी बैल, गोन्डा, गाय, वासरु, म्हैस, हेले आणि कगार-पारही आदी जनावरे घरेदी-विक्रीसाठी घेऊन येतात. त्यामुळं मंगळवारी या बाजारात पाय ठेवायलाही जागा नसते. परंतु, येत्या काही दिवसांमध्ये बकरी ईद (Bakri Eid) सण आहे. या पार्श्वभूमीवर या बाजारात बकरी ईदनिमित्त कसायांकडून जनावरांची खरेदी-विक्री होणार असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी बाजार समितीत पहारा ठेवून कसायाचा डाव हाणून पाडला होता. खुद आमदार अनुप अग्रवाल आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांनीही या ठिकाणी धाव घेतली होती.
जनावरांना मिळाले जीवदान : गोरक्षकांमुळं सुमारे सव्वाशे ते दीडशे जनावरांना जीवदान मिळालं. या घटनेनंतर महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या सूचनेनुसार, धुळे बाजार समिती ३ ते ८ जून या कालावधीसाठी बंद ठेवण्यात आली आहे. तब्बल दीड ते दोन दशकानंतर प्रथमच बाजार समितीत गुरांचा बाजार बंद ठेवण्यात आला आहे. आज खरेदी-विक्रीचे कोणतेही व्यवहार झाले नाहीत. बाजार समितीत प्रथमच असा शुकशुकाट पाहायला मिळाल्याचं कामगारांनी सांगितलं.
हेही वाचा -